अहमदनगर

नगर :आषाढी वारी.. एसटी आपल्या दारी! 45 भाविकांच्या समूहासाठी गावातूनच बसची सोय

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नगर विभागाने जादा बसची व्यवस्था केली. तारकपूर बसस्थानकावरुन 6 जुलैपासून बस सुटणार आहेत. याशिवाय महामंडळाने भाविकांच्या दारात बस उपलब्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 45 भाविकांचा समूह असल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूर वारीसाठी बस उपलब्ध केली. घरापासूनच बसमध्ये घेतल्यानंतर आणि पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांना थेट घरी आणून सोडण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रा असते. विठोबाच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रातील भाविक पंढरीचा मार्ग धरीत आहेत. पंढरपूरची यात्रा म्हणजे विठोबाच्या भक्तांची मांदियाळी. कोणी दिंडीत सहभागी होते. कोणी खासगी वाहनाचा तर कोणी महामंडळाच्या लालपरीचा आसरा घेतो. महामंडळ देखील भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षी जादा बसची व्यवस्था करीत आहे. यंदा नगर विभागाच्या वतीने जादा 300 बसेसचे नियोजन पंढरपूर यात्रेसाठी करण्यात आले असल्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.

सलग आठ दिवस जादा बसची व्यवस्था केल्यास महामंडळाला सव्वा ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न सहजरित्या मिळते. कोरोनामुळे दोन वर्षाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. तारकपूर बसस्थानकावरुन 6 जुलै ते 14 जुलै या नऊ दिवसांत सलग 24 तास एसटी महामंडळाची सेवा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी तारकपूर बसस्थानकावरुन पंढरपूर यात्रेसाठी जादा बस सुटणार आहेत. या कालावधीत नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकावरुन एकही बस सुटणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

तारकपूर स्थानकावरूनच बससेवा

नगर विभागातील तारकपूर, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, संगमनेर व पारनेर या आगारांच्या यात्रा बस फक्त तारकपूर बसस्थानक येथूनच भाविकांची वाहतूक करणार आहे. मात्र, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड आगाराच्या बस त्यांच्या आगारातून माहिजळगाव, करमाळामार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशी दिवशी पैठण येथे देखील बस सोडण्यात येणार आहे. भाविकांच्या उपलब्धतेनुसार शेवगाव व पाथर्डी बसस्थानकावरुन बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या गावातून 45 भाविक पंढरपूर यात्रेसाठी जाण्यास इच्छूक असतील, अशा भक्तांसाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र बसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी महामंडळाची बस गावात येऊन भाविकांना घेऊन जाणार आहे. विठोबाचे दर्शन झाल्यानंतर परत गावात आणून सोडण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी इच्छुक भाविकांनी बुकींगसाठी जवळच्या आगारात तसेच तारकपूर आगार प्रमुख अभिजीत आघाव व विठ्ठल केंगारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

परतीसाठी विठ्ठल कारखान्यावर बसस्थानक

पंढरपूर यात्रेसाठी नगर विभागाच्या वतीने जादा बसची व्यवस्था केली आहे. बुधवारपासून बस सुटणार आहेत. विठोबाचे दर्शन झाल्यानंतर परत येण्यासाठी देखील बसची व्यवस्था महामंडळाने केली आहे. त्यासाठी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानक उभारण्यात आले आहे. परतीसाठी या बसस्थानकावरुन 6 ते 14 जुलै या कालावधीत बस सुटणार असल्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT