नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या आसपास जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी गुरुवारी गट व गणांची आरक्षण सोडत झाली. पहिल्याच दिवशी आढळगाव गटाच्या आरक्षणाविरोधात एक तक्रार दाखल झाली. अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण रदृ करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 85 गटापैकी अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. पहिल्याच दिवशी या गटाच्या आरक्षणाविरोधात शेडगाव येथील रहिवासी विजय शंकरराव शेंडे यांची हरकत दाखल झाली. आरक्षण सोडत चक्रानुक्रमाने झालेली नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले. 1997 ते 2022 पर्यंत पाच पंचवाषिंक निवडणुका झालेल्या आहेत. या पाच निवडणुकीपैकी एकदाच 2002 ते 2007 मध्ये गट खुल्या प्रवगाींसाठी होता.
इतर चार वेळा मात्र अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जाती तसेच इतर दोन वेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित होता. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देखील हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.
गेल्या सहा टर्ममध्ये तीन वेळा एकाच जातीचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या गटासाठीचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण रदृ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.