नगर : पुढारी वृत्तसेवा: महापालिका बांधकाम व अतिक्रमण विभागाने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम सुरू केली. आज मोहिमेच्या दुसर्या दिवशी दाळमंडई आडते बाजार व कोंड्या मामा चौक मंगलगेट भागातील तीन इमारती जमिनदोस्त केल्या. पहिल्या टप्प्यातील मोहीम आज संपली असून, दुसर्या टप्प्यातील मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत गेल्या शंभर वर्षांच्या इमारती असून, अनेक जण त्या धोकादायक इमारतीचा वापर करीत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात काही दुर्घनाही घडल्या मात्र, जीवितहानी झाली नाही. धोकादायक इमारतीच्या मनपाच्या बांधकाम विभागाकडे आतापर्यंत 162 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील सर्व तक्रारींची शहानिशा करून मोडकळीस आलेल्या 15 इमारतींची शहर अभियंता सुरेश इथापे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली आणि त्या इमारती उतरविण्याचा निर्णय घेतला. त्याची कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण केली.
धोकदायक इमारतीचे मुळमालक अथवा भाडेकरून वारंवार नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे शहर बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाच्या पथकाने अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली. पहिल्या दिवशी माळीवाडा व चौपाटी कारंजा येथील तीन इमारती उतरविण्या आल्या.
बुधवारी दाळ मंडई (आडते बाजार) येथील कोठारी व शेटे यांची तर, कोंड्यामामा चौक (मंगलगेट) येथील इंगळे यांची धोकादायक इमारती महापालिकेने जमिनदोस्त केल्या. महापालिकेच्या शहर अभियंता सुरेश इथापे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, बांधकाम विभागाचे अमोल लहारे, अशोक बिडवे, जिरवान शेख, अर्जुन जाधव, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, इलेक्ट्रिक विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभागाचे शंकर मिसाळ यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात शहरातील सहा धोकादायक इमारती उतरविण्यात आल्या आहेत. एकूण पंधरा इमारतीचा आराखडा तयार केला आहे. दुसर्या टप्प्यातील मोहीम लवकरच सुरू करण्यात येईल.
-सुरेश इथापे, शहर अभियंता.