अहमदनगर

नगर : अधिकृत नळजोडणी हुडकण्यासाठी शहरामध्ये शोध मोहीम

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीत अनेक मालमत्ता धारकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन असणार्‍यांनी दंडाच्या रकमेसह सहा हजार 700 रुपये भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

मनपाकडून 2021-2022 चे अंदाजपत्रकीय महासभेमध्ये अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने धोरण निश्चित केले होते. मात्र, अद्यापही महानगरपालिका हद्दीतील काही नागरिकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची माहिती आहे. त्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडून अनधिकृत नळधारकांना त्यांचे नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे.

या कालावधीत त्यांच्याकडून 3700 रुपये दंड व नळजोडणी आकार 3 हजार याप्रमाणे एकूण सहा हजार 700 इतकी रक्कम भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अन्यथा एक महिन्यानंतर (दि.2 सप्टेंबर2022) पासून मालमत्ता कर आकारणी करणारे सर्व प्रभागाकडील कर्मचार्‍यांमार्फत विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविणार

नागरिकांनी स्वतः होऊन अनाधिकृत नळ कनेक्शनची अधिकृत जोडणी न केल्यास मनपा अधिकारी शोध मोहीम राबविणार आहे. नागरिकांकडे अनधिकृत नळजोड आढळल्यास तीन हजार 700 रुपये दंड व चार हजार रुपये नळजोड असे एकूण सात हजार 700 रुपये वसूल करून त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT