अहमदनगर

नगर : अधिकारी, कर्मचार्‍यांना बदलीची प्रतीक्षा

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन आठवडा उलटला. परंतु अद्यापि बदल्यांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे बदल्यांचे आदेश कधी जारी होणार याची प्रतीक्षा बदलीस पात्र असणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना लागली आहे.

दरवर्षी मेअखेरीस शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्या होतात. त्यानुसार यंदाच्या वर्षी बदलीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले. हव्या त्या ठिकाणी बदली होणार या आनंदात इच्छुक अधिकारी व कर्मचारी निवांत झाले होते. मात्र, बदलीची ऑर्डर जारी होण्यास अवघे दोन-चार दिवस बाकी असतानाच राज्य शासनाने या बदली प्रक्रियेस 30 जून 2022 पर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आनंदावर विरजण पडले.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणांची रचना तसेच ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरु असल्यामुळे बदल्यांना एक महिना स्थगिती देण्यात आल्याचे राज्य शासनाने नमूद केले. दरम्यान, महिनाभरात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे.मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी कारभार सुरु केला. मात्र, अद्यापि मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. गृह, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, जलसंपदा, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, सहकार व इतर विविध खात्यांना अद्यापि मंत्री नियुक्त झाले नाहीत.

अधिकारी वर्गाच्या बदल्या मंत्रालयात होतात. कर्मचार्‍यांच्या बदल्या स्थानिक प्रशासन करीत आहे. मात्र, अद्यापि नवीन सरकारमधील मंत्रीच नियुक्त झाले नाहीत. त्यामुळे बदल्यांचे आदेश रखडले गेले आहेत. मात्र,मंत्रिमंडळाचा कधी विस्तार होणार आणि कधी बदल्यांची ऑर्डर येणार याची प्रतीक्षा अधिकारी व कर्मचार्‍यांना लागली आहे.

राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. आठवडाभरात बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी केली. असेच निवेदन सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने शासनाला दिले आहे.

नोव्हेंबरपर्यंत बदल्यांना स्थगिती

नव्या सरकारने नोव्हेंबरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली असल्याचे मेसेच सरकारी कर्मचार्‍यांच्या सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, या मेसेजला सरकारी आदेशाचा पुरावा नाही. खरंच नोव्हेंबरनंतर बदल्या झाल्यास कर्मचार्‍यांची तारांबळ उडणार आहे. अधिकार्‍यांच्या मुलांना कोठेही आणि कोणतीही शाळा प्रवेश देईल. मात्र, कर्मचार्‍यांच्या मुलांना प्रवेश मिळणे अवघड आहे. त्यामुळे आठ दिवसांत बदल्या होण्याची आवश्यकता असल्याचे मत एका महिला कर्मचार्‍यांनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT