अहमदनगर

नगर : अखेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे अनावरण

अमृता चौगुले

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या सात महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अखेर सोमवारी अनावरण करण्यात आले. दरम्यान, मातंग समाज बांधवांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पुण्यतिथीचे औचित्य साधून लो. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद राक्षे यांच्या नेतृत्वाखाली लो. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा जनतेसाठी अखेर खुला करण्यात आला.

कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर आणि येवला रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी माजी मंत्री सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रयत्न केले.

शासनाची परवानगी, आचार संहिता आदी कारणांमुळे डिसेंबर 2021 पासून या पुतळ्याचे अनावरण रखडले होते. त्यात काही लोकांनी नाहक राजकारण आणून खोडा घातला होता. त्यामुळे हा पुतळा तेव्हापासून झाकून ठेवल्याने पुतळा लोकार्पण झाले नव्हते. यातून मातंग समाज बांधवांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. अखेर आज 18 जुलै रोजी लो. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी विनोद राक्षे यांच्या नेतृत्वाखाली अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण करून हा पुतळा जनतेसाठी खुला करण्यात आला.

यावेळी लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक- अध्यक्ष शरद छबुराव त्रिभुवन, विधीज्ज्ञ नितीन पोळ, अनिल मरसाळे, सोमनाथ मस्के, भाऊसाहेब आव्हाड, अनिल पगारे, अर्जुन मरसाळे, प्रवीण शेलार, संदीप निरभवणे, अनिल जाधव, निसारभाई शेख, विनोद वाकळे, सुजल चंदनाशिव, रोहिदास पाखरे व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मातंग समाज आनंदला..!

अखेर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिवशी पूर्णाकृती पुतळा खुला झाल्याने मातंग समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT