अहमदनगर

नगर : अकोलेतील बारवर कारवाईचा प्रस्ताव

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर येथील रायतेवाडीमध्ये बनावट दारूसाठा आढळल्याप्रकरणी सुरेश मनोज कालडा याला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याचे अकोले येथील सुरभी परमिट बिअर बार दुकानाशी संबंध असल्याने तेथे छापा टाकून दारू विक्रेत्याने (ब्रिज केस) नियमभंग केल्याचे स्पष्ट झाल्याने सुरभी बारवर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार असल्याचे दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी यांनीत्सांगितले.

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथील चैतन्य सुभाष मंडलिक याच्या घरावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या दिवशी सोमवारी भल्या पहाटे राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वाजे, दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी व कर्मचार्‍यांनी छापा टाकून गोवा राज्यनिर्मित व महाराष्ट्रात बंदी असलेल्या 687 सीलबंद बाटल्या, 7 हजार 500 बनावट बाटल्यांचे बूच व हुंदाई कार असा एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चैतन्य सुभाष मंडलिक व सुरेश मनोज कालडा यांना ताब्यात घेण्यात आले. कालडा बंधूंचे अकोले व संगमनेरमध्ये परमिट बारची दोन दुकाने असून, संगमनेरच्या बनावट दारूचे अकोले कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मात्र, बनावट दारू प्रकरणातील सूत्रधार सुरेश कालडा हा अकोले सुरभी बार परमिट रुममध्ये लायन्सधारकाचा जवळचा नातेवाईक आहे. त्यामुळे दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अकोल्यातील सुरभी बियर बार या दारुच्या दुकानावर छापा टाकला असता, ब्रिज केस म्हणजे दारू विक्रेत्याने नियमभंग केला. याप्रकरणी या दारू विक्रेत्यावर कडक कारवाई व्हावी, यासाठी, जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, तसेच शिवकुमार मनोज कालडाला ताब्यात घेतल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

अकोलेत बनावट दारूचा पूर!

अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री सुरू आहे. यापूर्वी अकोले शहरातील एका वाईन्सवर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर बनावट दारू जप्त करण्यात आली होती. त्यातच संगमनेरच्या बनावट दारूचे अकोले कनेक्शन असल्याने अकोलेकरांच्या जीवाशी मोठा खेळ सुरू आहे. परंतु महात्मा फुले चौकामध्ये 'बसं झाले, बनावट दारू निर्मितीद्वारे लोकांच्या जीवाशी खेळणार्‍याचा जाहीर निषेध, शासनाकडून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा,' असे सुजाण नागरिक मंच यांनी फ्लेक्स बोर्ड लावल्याने ते अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. 'दारू पिणार्‍यांनो, तुम्ही दारू नाही, तर विष पित आहात. त्यामुळे अशा बनावट दारू विक्री करणार्‍या दुकानदारांवर कडक कारवाई होऊन हे परमिट रूम बार कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी सामाजिक संघटना व दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

अकोल्यातील शाहूनगरमध्ये दारुमुळे 23 जणांचा मृत्यू झाल्याने अनेक महिला विधवा झाल्या. अकोलेतबनावट दारू तयार करणार्‍या दुकानांचे परवाने रद्द करावे. ग्राहकांनी निर्व्यसनी होऊन सुरक्षित जगण्याचा मार्ग अवलंबवा.

                                                    – हेरंब कुलकर्णी. दारुबंदी चळवळ प्रणेते, अकोले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT