अहमदनगर

नगर : 49 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील काल रविवारी 123 केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 49 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तर चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली.

पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिकच्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती. काल रविवार दि. 31 रोजी जिल्ह्यातील 123 केंद्रांवर ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी 52 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी होती. मात्र, प्रत्यक्षात परीक्षेवेळी दोन्ही पेपरसाठी 49 हजार विद्यार्थ्यांची हजेरी लावली, तर तीन हजार विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

पहिला पेपर भाषा आणि गणित या विषयांचा सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत झाला. 150 गुणांसाठी 75 प्रश्नांचा हा पेपर होता. त्यानंतर दुसरा पेपर हा तृत्तीय भाषा व बुद्धिमता चाचणीचा होता. दुपारी 1.30 ते 3 या वेळेत हा पेपर झाला. त्यातही 75 प्रश्नांसाठी 150 गुण दिलेले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 वाजता हजेरी लावली होती. केंद्रांवर शाळेचे शिक्षकही आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने पेपर सोडवल्याचे पहायला मिळाले.

मुले पुढच्या वर्गात गेल्यावर परीक्षा!

परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मात्र, यावर्षी परीक्षेची नियोजन कोलमडल्याचे दिसून आले. पाचवीची मुले सहावीत गेल्यानंतर आणि आठवीचे नववीत गेल्यानंतर या परीक्षेसाठी मुहूर्त सापडल्याचे दिसले. त्यामुळे पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT