अहमदनगर

‘दीड हजार द्या, योजनेचा धनादेश घेऊन जा’ ; तोतया कर्मचार्‍याकडून शेतकर्‍यांची फसवणूक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या विविध योजनांच्या लाभ मिळवून देतो, असे सांगून शेतकर्‍यांना गंडा घालणारा 'तोतया' कर्मचारी चांगलाच चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यापासून तुमचा चेक आला आहे, तो ऑफीसमधून घेवून जा, असे सांगून 'त्या' बहादराने 10 ते 15 शेतकर्‍यांकडून हजारो रुपये उकळले आहेत. प्रत्यक्षात काल काही शेतकरी कृषी विभागात धनादेश घेण्यासाठी आले असता, 'त्या' नावाचा कोणताही कर्मचारी येथे कार्यरत नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली. त्यामुळे फसगत झालेल्या शेतकर्‍यांनी जड पावलांनी परतीचा मार्ग पकडला. जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण इत्यादी विभागातून वैयक्तीक योजनांचा लाभ दिला जातो. यात गायगोठा प्रकरण, पिकविमा व अन्य कृषी योजनांचाही समावेश आहे.

योजनेच्या लाभासाठी अनेक शेतकरी आपले प्रस्ताव सादर करतात. त्यानंतर या शेतकर्‍यांचे योजनेच्या लाभाकडे डोळे असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून एक 'तोतया' कर्मचारी अशा शेतकर्‍यांच्या भेटी घेवून 'गायगोठा, पिकविमा किंवा कृषीच्या योजनांसाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही 1500 रुपये मला द्या आणि ऑफीसमध्ये येवून तुमचा चेक घेवून जा' असे बतावणी करतोय. भोळाभाबडा शेतकरी देखील लगेच 'त्या' व्यक्तीला पैसे देवून टाकतो.

अशाप्रकारे आठवड्यापासून 10-15 लोकांच्या खिशावर 'त्या' व्यक्तीने डल्ला मारला आहे. दरम्यान, संबंधित शेतकरी आपला धनादेश घेण्यासाठी झेडपीत आले होते. त्यांनी कृषी विभागात जावून आपण पैसे दिलेल्या कर्मचार्‍याची विचारपूस केली, मात्र, अशा नावाचा कर्मचारीच आमच्याकडे नसल्याचे उत्तर मिळाल्याने शेतकर्‍यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी 'त्या' मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद होता. त्यामुळे शेतकर्‍यांना फसविणारा 'तोतया' आता झेडपी प्रशासनाच्याही रडारवर आला आहे.

कृषी विभागाच्या विविध योजनासाठी पारदर्शीपणे लाभार्थी निवड केली जाते. निवडीनंतर पात्र लाभार्थ्यांना तसे कळविले जाते. त्यामुळे चुकीच्या माहितीला आणि आमिषाला बळी पडू नका. अशाप्रकारे जर कोणी पैशांची मागणी करत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क करा.
                                                       -शंकर किरवे, कृषी अधिकारी ; जि.प.

सीईओंकडूनही गंभीर दखल
कडबाकुट्टी वा अन्य कृषी साहित्यासाठी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. मात्र, याबाबत कोणी जर लेखी तक्रार केल्यास चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतकर्‍यांनीही खबरदारी घेवून अशा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सीईओ आशिष येरेकर यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT