अहमदनगर

दारणा, गंगापूर कार्यक्षेत्रात रिमझिम पाऊस

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी पर्जन्यराजा कोपरगावकरांवर रूसला आहे. महिना उलटून गेला, तरी पाऊस काही होत नसल्याने बळीराजा चिंतातूर झालेला आहे. त्याने पदरमोड करून खरीप पीक पेरणीसाठी घेऊन ठेवलेले बी-बियाणे त्यांच्या सपरातच पडलेले आहे. दारणा, गंगापूर धरण कार्यक्षेत्रावर रिमझिम पाउस पडत आहे. त्यामुळे धरणेही अजून कोरडीच आहेत.

गेल्यावर्षी 4, 14 व 29 जून रोजी मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पावसाचे पाणी सोडले होते. यंदा मात्र आषाढी एकादशी आली, तरी नवीन पाणी गोदावरीला आलेले नाही. नाशिक, इगतपुरी भागात 5 जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमिटरमध्ये पुढीलप्रमाणे, तर कंसातील आकडे आजपर्यंत पडलेल्या पावसाची आहे.

दारणा 4 (224), गंगापूर 9 (290), इगतपुरी 45 (592), त्र्यंबकेश्वर 6 (198), नाशिक 1 (109), नांदूर मध्यमेश्वर 3 (119), देवगांव 6 (87), ब्राह्मणगाव 0 (100), कोपरगाव 0 (75), पढेगाव 0 (86), सोमठाणे 0 (217), कोळगाव 0 (216), सोनेवाडी 0 (125), शिर्डी 0 (96), राहाता 0 (188), रांजणगाव खुर्द 10 (125), चितळी 0 (127), याप्रमाणे पाऊस झाला आहे.

कोळपेवाडी मोर्विस परिसरात गेल्यावर्षी 29 जून 2021 रोजी ढगफुटी सदृष्य पाऊस झाला होता. चालू वर्षी मात्र वरुणराजाने कोपरगाव तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मढी भागात चांगला पाऊस झाल्याने तेथे शेतकर्‍यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र, संपूर्ण तालुक्यात अद्यापही पाऊस नसल्याने बळीराजा आकाशाकडे टक लावून बसला आहे. त्याने महागडे बी-बियाणे खरेदी केले. शेती मशागतीची कामे करून ठेवली, पण आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली असूनही अद्यापही पाऊस नाही. त्यामुळे शेतकर्‍यांकडील पशुधन जगवायचे कसे? हा प्रश्न आहे.

धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा
दारणा धरण 7 टीएमसी म्हणजेच 7200 दलघफू क्षमतेचे आहे. त्यात अवघा 1585 दलघफू पाण्याचा साठा आहे, तर गंगापूर धरणात 1437, भावली धरणात 352 दलघफू पाण्याचा साठा आहे. या भागातील शेतकरी बळीराजा पंजाबराव डख यांच्या हवामानविषयक भाकितावर फिदा झालेले होते. पण यावर्षी पाऊस कधी होणार? याचे भाकीत ते नेमकेपणाने वर्तवू शकलेले नाहीत.त्यामुळे शेतकर्‍यामध्ये पुन्हा एकदा निराशा पसरलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT