अहमदनगर

नगर : दरोड्याच्या तयारीतील टोळीला बेड्या ; ‘एलसीबी’ची श्रीरामपुरात धडक कारवाई

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडाच्या तयारीत असलेल्या सात गुन्हेगारांच्या सराई टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूर एमआयडीसी येथून एलसीबीच्या पथकाने आरोपींना अटक केली असून, घातक हत्यारांसह दागिने, मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या टोळीतील दोन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या चेन स्नॅचिंगच्या नऊ ते दहा गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. योगेश सिताराम पाटेकर (वय 25, रा. वडाळा महादेव, श्रीरामपुर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय 21, रा. श्रीरामपुर), बबलू ऊर्फ दानिश शौकत शेख (वय 24, रा. श्रीरामपूर), सुरेंद्र अशोक पवार (वय 20, रा. निमगाव, शिर्डी, ता. राहाता), साहिल महेश साळुंके (वय 18), शुभम वसंत वैद्य (वय 22), सागर संतोष केदारे (वय 22, डोघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती की, श्रीरामपूर ते वाकडी रस्त्यावरील रेल्वे बोगद्याजवळ काही जण थांबलेले असून, दरोड्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने रेल्वे बोगद्याजवळ डबा धरून बसलेल्या सात जणांना अटक केली. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांनी ही कामगिरी पार पाडली.

चार आरोपींवर पूर्वीचे 21 गुन्हे
एलसीबीने अटक केलेल्या चार आरोपींवर यापूर्वीचे तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत. योगेश सिताराम पाटेकर याच्यावर दरोडा, जबरी चोरी, विनयभंग व चोरी असे 14 गुन्हे दाखल आहेत. दानिश शौकत शेख याच्यावर जबरी चोरी व चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तर, सागर संतोष केदारे याच्यावर चोरी, दुखापत असे तीन गुन्हे दाखल आहेत. साहिल महेश साळुंखे याच्यावर चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची कबुली
एलसीबीच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर कुठे व किती गुन्हे केले याची चौकशी केली. आरोपी योगेश सिताराम पाटेकर याने 31 जुलै रोजी साहिल साळुंके याच्यासोबत मिळून श्रीरामपूरमध्ये रस्त्याने जाणार्‍या महिलेच्या गळ्यामधुन मंगळसूत्र ओरबाडल्याची कबुली दिली.

आरोपींकडे एअरगन, तलवार, दांडके
आरोपींच्या अंगझडतीत 10 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, 5 ग्रॅम वजनाची तुटलेली चैन, एअरगन, तलवार, तीन दांडके, एक नायलॉन रस्सी, सहा मोबाईल, चार मोटारसायकल असा पाच लाख 61 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT