अहमदनगर

‘त्या’ प्रकरणावरून तनपुरे-कर्डिले आमनेसामने; पोलिस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश असताना देखील गुन्हा दाखल होत नाही. दुसरीकडे कोणतीही शहानिशा न करता अ‍ॅड. अभिषेक भगत यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जातो. याबाबत पोलिस यंत्रणेचा विरोधाभास दिसतो. येथील पोलिस यंत्रणा भाजपात नव्याने दाखल झालेल्या व्यक्तींचे बाहुले बनले, असा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करा तसेच अ‍ॅड. भगत यांच्यावरील गुन्हा मागे घ्या अन्यथा सर्वपक्षीय उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यानिमित्ताने आ. प्राजक्त तनपुरे-शिवाजी कर्डिले आमने-सामने आले आहेत.

अ‍ॅड. भगत यांच्याविरोधात कोणतीही शहानिशा न करता अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे नाव या गुन्ह्यातून वगळण्यात यावे, या मागणीचे निवेदन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी गुरुवारी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले. त्यानंतर आमदार तनपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार तनपुरे म्हणाले, जमिनीवरुन माजी आमदार कर्डिले व अ‍ॅड. भगत यांच्यात वाद सुरु आहे. पोलिसांनी दाद न दिल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने कर्डिले पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश 8 सप्टेंबरला दिले. परंतू कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तत्काळ गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करुन माजी आमदार कर्डिले यांना एक प्रकारची मदतच केल्याचा आरोप आ. तनपुरे यांनी केला.

उपअधीक्षकांची परवानगी नसताना देखील 13 सप्टेंबर रोजी अ‍ॅड. भगत यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी तालुक्यातील व इतर ठिकाणच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर व्यक्तीगत स्तरावर गुन्हे दाखल आहेत. या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर थेट तडीपारीचे आदेश काढण्यात आले. मात्र, माजी आमदार कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मग त्यांच्यावर तडीपारीची कारवाई का होत नाही, असा सवाल आमदार तनपुरे यांनी उपस्थित केला. अ‍ॅड. भगत यांना तत्काळ पोलिस संरक्षण देऊन, खोट्या गुन्ह्यातून त्यांचे नाव वगळण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी केली आहे. यावेळी अ‍ॅड. भगत यांनी कर्डिलेंकडून होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचला. पत्रकार परिषदेला

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, भाजपचे सुवेंद्र गांधी, बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले, शरद झोडगे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुरी तालुक्यातील व इतर ठिकाणच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर व्यक्तीगत स्तरावर गुन्हे दाखल आहेत. या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर थेट तडीपारीचे आदेश काढण्यात आले. मात्र, माजी आमदार कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मग त्यांच्यावर तडीपारीची कारवाई का होत नाही.

– प्राजक्त तनपुरे, आमदार.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT