नगर : पुढारी वृत्तसेवा : बोल्हेगाव येथे वृद्धाने बालकासोबत अनैसर्गिककृत्य केल्याने त्याला जमावाने मारहाण केली. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात चौघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
राजेंद्र रामकृष्ण नायर (वय 36, रा. बोल्हेगाव आखाडा, वाकळे वस्ती), अझर शाब्बीत शेख (वय 19 रा. गांधीनगर, बोल्हेगाव), सिकंदर मेहमूद शहा (वय 19 रा. संभाजीनगर, बोल्हेगाव) व सोमनाथ बापू गायकवाड (वय 38, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत व्यक्तीच्या नातेवाईकाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
राजेश काशीनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55, मुळ रा. भेंडा, ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पीडित मुलगा घराच्या खाली किराणा दुकानामध्ये गेला होता. तो परत न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला असता तो सोनारबाबाच्या घरात मिळून आला.
सोनारबाबाने मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची फिर्याद मुलाच्या आईने दिली होती. दरम्यान, आईने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी सोनार बाबाला मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.