अहमदनगर

टीईटी घोटाळ्यात नगरचे 10 शिक्षक? ‘माध्यमिक’च्या 49 शिक्षकांची पडताळणी सुरूच

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : टीईटी घोटाळ्यातील वशिल्यावर पास झालेल्या 'त्या' 7800 शिक्षकांची यादी चांगलीच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या यादीत जिल्ह्यातील खासगी शाळेत शिकविणार्‍या 10 शिक्षकांचा समावेश असल्याच्या चर्चेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्राथमिकच्या 8 शिक्षकांना क्लिनचीट मिळाली असून, माध्यमिकची पडताळणी अद्याप बाकी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी शाळांमधील 2013 नंतर टीईटी पास होऊन सेवेत दाखल झालेले 80 पेक्षा अधिक शिक्षक रडारवर आले होते. यामध्ये प्राथमिकचे 8, खासगी शाळांमधील 29 शिक्षकांचे 31 आणि माध्यमिकचे 49 शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परीक्षा परिषदेकडे पाठविले होते. राज्यातील अशा संशयित शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पुणे सायबर क्राईम विभागाने बारकाईने तपासणी केली होती. त्यात 7800 शिक्षक हे पैसे देऊन वशिल्याने पास झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यामुळे या यादीत नगरचे किती शिक्षक आहेत, याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

दरम्यान, या यादीची जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पडताळणी सुरू आहे. मात्र, 'पुणे'तून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नगरच्या साधारणतः 10 शिक्षकांची या यादीत नावे असून, ते खासगी शाळेतील पहिली ते सातवीच्या वर्गातील असल्याचेही सांगितले जात आहे, तर माध्यमिकच्या 49 शिक्षकांपैकी किती जण वशिल्यावर पास झाले, याची आकडेवारी मात्र समजू शकली नाही.
दरम्यान, याबाबत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी अद्याप पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे सांगत, कानावर हात ठेवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT