संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वादातून तिघांनी सासरच्या मंडळीला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री तालुक्याच्या पठार भागातील शेंडेवाडी येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी जावयासह दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घारगाव पोलिसांनी सांगितले की, शेंडेवाडी येथील लक्ष्मीबाई गंगाराम काळे व पती गंगाराम काळे हे दोघे ओट्यावर झोपले होते. शुक्रवारी मध्यरात्री जावई मच्छिंद्र मनाजी जाधव, सोनबा विजय जाधव व अनोळखी तिघे आले. जावई मच्छिंद्र जाधव याने, तुम्ही तुमच्या मुलीला नांदायला का पाठवत नाही, असे विचारत सासुला मारहाण केली.
यावेळी सासरे गंगाराम काळे यांना देखील जावयाने शॉकबसरने डोक्यावर मारहाण केली. आरडाओरड ऐकून मेहुणे बाहेर आले असता त्यांना देखील मारहाण करुन शिवीगाळ केली. सोनबा विजय जाधव व अनोळखी इसमांनी मारहाण व शिवीगाळ करत दमदाटी केली.
या प्रकरणी सासू लक्ष्मीबाई काळे यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.