अहमदनगर

‘चितळी’च्या मळीमुळे शेतीचे झाले वाळवंट!

अमृता चौगुले

नाऊर : पुढारी वृत्तसेवा : चितळी येथील प्रायव्हेट कंपनीच्या गोदावरी परिसरातील नाऊर, नायगाव, जाफराबाद, गोंडेगाव, मातुलठाण, रामपूरसह उंदिरगाव, माळेवाडी भागात सतत सुरू असलेल्या मळीच्या टँकरमुळे या भागात श्वास घेताना घुसमट होत आहे. याच मळीमुळे चितळी भागातील शेतीचे वाळवंट झाले असून अशाच पद्धतीने मळीचा अतिरिक्त वापर सुरू झाला, तर हीच परिस्थिती गोदावरी परिसराची होण्यास वेळ लागणार नसल्याचे मत जाणकार शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

चितळीवरून निमगाव खैरी – नाऊर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मळीचे टँकरद्वारे अनेक शेतकर्‍यांच्या शेतामध्ये एक विशिष्ट प्रकारचे 100 रुपयांच्या स्टँपवर प्रतिज्ञापत्र घेऊन संबंधित कंपनी या भागात सर्रासपणे मळीचे टँकर सुरू असून या टँकरला ओव्हरलोड भरून चालक भन्नाट सुटत आहे. या ओव्हरलोड वाहनावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांना अद्याप वेळ मिळालेला दिसत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मळीयुक्त पाण्यामुळे चितळी भागातील शेती नापिक झाली असून निमगाव खैरी येथील मळीचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सुद्धा विहिरींना व बोअरवेलला सुद्धा मळीमिश्रित दूषित पाणी लागत असल्याने शेतीतील गुणवत्ता व पीक क्षमता कमी होत आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून विहिरीसह कूपनलिकांना देखील खराब व पाणी बेचव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकर्‍यांनी एकमुखी विचार करणे गरजेचे
आपल्या भागात बरेच शेतकरी शेतामध्ये मळीचे पाणी अतिप्रमाणात टाकत आहे. 20 चारी परिसरासह सर्वत्र वापर होत आहे. सध्या याचे दुष्परिणाम दिसत नसले, तरी पावसाळ्यात हेच मळीयुक्त पाणी जमिनीत मुरते. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर इतर शेतात पसरते, ज्या शेतकर्‍यांना हे पाणी टाकायचे नसते त्यांच्याही शेतात शेजारच्या शेतातून येते. हा शेतीसाठी शाप ठरणार असून यासाठी सर्वच शेतकर्‍यांनी एकमुखी विचार करण्याची गरज असल्याचे श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील शेतकरी वसंतराव तरस यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT