शेवगाव शहर : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी भाजीमंडई उघड्यावरच भरते. भाजीविक्रेते, शेतकरी बांधव, फळ विक्रेते भर पावसात व चिखलात दुकाने थाटतात. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिक, महिलांना चिखल तुडवतच भाजीपाला खरेदी करावा लागतो. या भाजीमंडई परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. शेवगाव नगरपरिषदेला भाजी विके्रते, शेतकरी एका तराजूला प्रती 20 रुपये सक्तीने घेतात; तर मग येथे स्वच्छता करणे गरजेचे आहे.
मोठा गाजावाजा करून शेवगाव नगरपरिषदेने गेल्या दोन, तीन वर्षांपूर्वी महात्मा फुले भाजी मंडई उभारली. या भाजी मंडईचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले. आज या मंडईची अवस्था असून, अडचण नसून, खोळंबा, अशीच झाली आहे, अशी प्रतिक्रिया विके्रत्यांनी व्यक्त केल्या.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल म्हणाले, दोन दिवसांत भाजी मंडईतील चिखलमय परिस्थिती मुरुम, माती टाकून दुरुस्त न केल्यास प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त नागरिक, भाजी पाला व फळ विक्रते मंडईमध्ये बोंबाबोंब आंदोलन करतील, तसेच काही माजी नगर सेवकांनी व नगरपरिषदेतील अधिकार्यांनी निधीत हेराफेरी केली आहे. त्यामधून काही निधी शिल्लक असेल तो या भाजी मंडईसाठी वापरावा, असा मागणी करण्यात आली.
वारंवार एकाच गोष्टीवर निधी खर्च
कोणत्या शहरातील प्राथमिक गरज भागवण्यासाठी भाजी मंडई म्हणजे अत्यावश्यक आणि मूलभूत गरज मानली जाते. प्रशासनाकडे वारंवार या गोष्टी करता मोठ्या प्रमाणात निधी येऊनही दुर्लक्ष होत असल्याचे शेवगावमध्ये सातत्याने दिसून येते आहे, असे विके्रते व नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष
शेवगाव भाजी मंडईची ही अवस्था दरवर्षी पावसाळ्यात होते. ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊनही या गोष्टीवरती अद्यापपर्यंत दैनंदिन गरजेच्या गोष्टी असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.