अहमदनगर

घरफोडीतील म्होरक्यास केले गजाआड, संगमनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात येथे झालेल्या घरफोडीच्या प्रकरणात तालुका पोलिसांनी यापूर्वीच तिघांना अटक केली होती. मात्र, यातील मुख्य सूत्रधार व अन्य साथीदार फरार होते. त्यांनाही पकडण्यात पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाला यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील रहिवासी शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे यांच्या घरी दि. 21 मार्च रोजी चोरी झाली होती. या चोरट्यांनी काळे दाम्पत्यास मारहाण करीत घरातील मौल्यवान वस्तूसह रोकड असा सुमारे 3 लाख 2 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते.

याप्रकरणी हरिश्चंद्र काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संगमनेर तालुक्याचे पो. नि. पांडुरंग पवार यांनी तपासाला गती दिली. प्रथमतः पोलिसांनी किरण आबासाहेब भवार (वय 27, रा. ब्राह्मणगाव वेताळ, ता. श्रीरामपूर), अनिल नंदू पवार (वय 26, रा. पिंपळे, ता. संगमनेर), संदीप सुरेश शहाणे (वय 23) यांना अटक केली होती.

या घटनेतील मुख्य आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. दरम्यान, संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सायबर सेलचे पो. ना. फुरकान शेख यांच्याकडून तांत्रिक विश्लेषनाचा आधार घेत त्या चोरट्यांचा माग काढला. हे दोघेही श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मदने यांना समजली. त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधून दोन्ही चोरट्यांची माहिती आणि त्यांचा ठावठिकाणा कळविला. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी कोळगाव शिवारात छापा टाकत बिट्ट्या ऊर्फ दिलीप ऊर्फ अविनाश काढण्या भोसले (वय 40) आणि राहुल ऊर्फ ज्ञानेश्वर भोसले या दोघांना ताब्यात घेतले. यानंतर संगमनेर पोलिसांनी त्यांना अटक करून संगमनेरात आणले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT