अहमदनगर

कोपरगाव पालिकेत काळे-कोल्हे लढणार, इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

अमृता चौगुले

कोपरगाव : महेश जोशी :  कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा कोल्हे- काळे यांच्या गटात पारंपरिक पद्धतीने निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे तर दुसरीकडे विरोधात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे.

एकिकडे शहरवासियांना निळवंडे, शिर्डी, कोपरगाव पिण्याच्या पाण्याची योजना तर दुसरीकडे पालिकेचा पाचवा साठवण तलाव या दोन मुद्यांभोवतीच ही निवडणूक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. साहजिकच पुन्हा एकदा या दोन्ही गटांभोवतीच राजकारण फिरणार आहे. अनेक महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक इच्छुक उमेदवार नगरसेवक होण्यासाठी उतावीळ झाले आहेत. मागील पाच वर्षांत नगरसेवकांची सत्ता शहरवासियांनी कोल्हे गटाच्या ताब्यात दिली, मात्र थेट जनतेने नगराध्यक्ष पदाची माळ विजय वहाडणे यांच्या गळ्यात घातली.

त्यामुळे पालिकेत बहुमत असुनही कोल्हे गटाला नगराध्यक्ष वहाडणे यांची मनधरणी करावी लागली. गेल्या पाच वर्षांत प्रभागात अथवा सर्वसामान्यांच्या समस्यांकडे कधीही ढुंकून न पाहणारे आता प्रत्येकाच्या सुख- दुःखात सहभागी होत आहेत. त्यातच पालिका निवडणुकीचे पडघम वाजल्याने ही सक्रियता आणखी जोर धरत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्याने पुन्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक जनतेतून होणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. त्यामुळे या पदासाठीही अनेकजण इच्छुक आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ही निवडणूक आरक्षणाशिवाय होत आहे. या मतांच्या नाराजीचे खापर कुणाच्या डोक्यावर फुटणार, याचाही निर्णय या निवडणुकीनिमित्त होणार आहे. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बहुदा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे अनेकांचा हिरमोड पुन्हा होऊ शकतो, अशी सध्या तरी स्थिती आहे. पालिकेवर आत्तापर्यंत कोल्हे गटाचे वर्चस्व राहिले आहे. कोणतेही पक्ष असले तरी कोपरगावी काळे- कोल्हे यांच्याभोवतीच सत्तेचा काटा फिरत राहतो. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिल्यानंतर आणि नगरसेवकांची सत्ता दुसर्‍या गटाला दिल्याने गेल्या पाच वर्षांत कोपरगाव शहराची काय अवस्था आहे, हे सर्वांच्या नजरेसमोर आहे, मात्र प्रत्येक गट विकासाच्या वल्गना करीत आहे.

तिसर्‍या पिढीचे वारसदार तयारीत!
आता नव्याने 15 प्रभागातून 30 नगरसेवकांना कोपरगाव पालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. काळे- कोल्हे घराण्याचे तिसर्‍या पिढीचे वारसदार सत्ता काबीज करण्यास कंबर कसून सज्ज आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT