कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील रहिवाश्यांनी, तसेच दुबार रेशनकार्डधारकांनी तहसील कार्यालय येथे नवीन रेशनकार्ड मिळावे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रक्रिया पूर्ण दिली आहे. मात्र, नवीन रेशनकार्ड स्टेशनरी शिल्लक नसल्याने या लाभार्थ्यांना रेशनकार्ड मिळत नाही. तेव्हा संबंधित विभागाने तत्काळ ही स्टेशनरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
साहेबराव रोहोम यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी जनआक्रोश आंदोलन घेवून त्यात याबाबतचे सविस्तर निवेदन दिलेले आहे. मात्र, त्यावर अद्यापही कोपरगाव तहसील कार्यालयाकडे नविन रेशनकार्ड स्टेशनरी मिळालेली नाही, परिणामी ज्या लाभार्थ्यांनी नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका यासाठी नाव नोंदणी करून आवश्यक ते कागदपत्रे देवूनही या लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळत नाही.
तहसीलदार विजय बोरुडे, तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व संबंधित यंत्रणेस नवीन रेशनकार्ड स्टेशनरी मिळावी म्हणून भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मागणी करून त्याचा पाठपुरावा केलेला आहे, तरी या लाभार्थ्यांना तत्काळ नवन रेशनकार्ड द्यावे, असेही तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी शेवटी म्हटले आहे.