अहमदनगर

कोपरगाव : दोन तरुणांचा तळ्यात बुडून मृत्यू अंकाई किल्ल्यावरील दुर्दैवी घटना

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या कोपरगावच्या दोन युवकांचा तळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.16) दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. या घटनेने कोपरगावमध्ये शोककळा पसरली. मिलिंद राजू जाधव (वय 27 रा. गोरोबानगर, कोपरगाव) व रोहित राठोड (वय 17, रा. सुभाषनगर, कोपरगाव) अशी या मृत तरूणांची नावे आहेत. शहरातील सुमारे दहा ते पंधरा युवक मंगळवारी दुपारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील अंकाई येथील अंकाई किल्ल्यावर पर्यटन व देवदर्शनासाठी गेले होते.

यावेळी तेथे असलेल्या तळ्यात मिलिंद जाधव व त्याचा आतेभाऊ रोहित राठोड यांचा बुडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद जाधव यांचा पाय घसरून तो तळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रोहित राठोड याचाही तोल जाऊन तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी कोपरगावे येथे फोन करून ही घटना कळविली. त्यानंतर तेथील नगरसेवक अल्ताफ कुरेशी, कलिम शेख, सागर विसपुते, विजय मोरे, शिवा सातोटे, गणेश शिंदे, मंगेश मरसाळे, अंकुश मोरे, अर्जुन मरसाळे, आकाश साटोटे, इम्रान बागवान, आसिफ शेख आदी तातडीने अंकाई व येवले येथे मदतीसाठी दाखल झाले.

त्याआधी किल्ल्यावर असलेल्या काही तरुणांनी घटनेची माहिती पायथ्याशी असलेल्या अंकाई गावातील नागरिकांना दिली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अंकाई येतील रितेश परदेशी, रवींद्र अहिरे, अक्षय वैद्य, राहुल अहिरे, लखन व्यापारे, गुड्डू पठाण, श्रीराम सोनवणे आदींनी तळ्यातून दोन्ही मृतदेह शोधण्यापासून थेट किल्ल्यावरून पायथ्याशी आणण्यासाठी मदत केली. त्या दोघांचे मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री कोपरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

SCROLL FOR NEXT