अहमदनगर

कोंभळी : ऐन पावसाळ्यात तलाव खपाटीला खरिपाने तारले

अमृता चौगुले

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी कोंभळी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने परिसरातील सर्वच तलाव जवळपास पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने कोंभळी परिसरातील तलावांचे पोट खपाटीला गेले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतातूर झाला असून, पुढील हंगामातील पिकांचे काय होणार, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. कोंभळी परिसरातील शेती ही पावसावर आधारित आहे. पाऊस पडला तरच इथली शेती पिकते.

पाऊस न पडल्यास दुष्काळ पडतो. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होतो. फळबागांना टँकरद्वारे पाणी घालून त्या वाचवाव्या लागतात. त्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यास परिसरातील शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहणार आहे.
परिसरात थेरगाव व गुरवपिंप्री येथे लघु पाटबंधारे तलाव आहेत. तसेच, खांडवी, कोंभळी, भोसे, मुळेवाडी, चांदे परिसरात छोटे-मोठे तलाव आहेत. गतवर्षी या तलावात 50 ते 80 टक्क्यांपर्यंत पाणी आले होते. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने या तलावांची पातळी खालावली आहे. या तलावांवर शेती तसेच पाणी योजना अवलंबून आहेत. थेरगाव व गुरवपिंप्री येथील लघुपाटबंधारे तलावावर मोठे सिंचनक्षेत्र अवलंबून आहे.

यंदा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी म्हणावा असा दमदार पाऊस अजूनही झालेला नसल्याने त्याचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शेतात उभी असलेले तूर, कपाशी, कांदा, पालेभाज्या, फळबागा, ऊस ही सर्व पिके रिमझिम बरसणार्‍या पावसावर तग धरून आहेत. परिसरात धो धो पाऊस झाला नसल्याने, विहिरींना पाणी उतरले नाही. मोठा पाऊस न झाल्यास येत्या काही महिन्यांत विहिरी, कूपनलिकांची पातळी खालावण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. यानंतर किमान परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळला, तरच पुढील रब्बी हंगाम घेता येईल. अन्यथा, शेतकर्‍यांपुढे समस्यांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

थेरगाव पाटबंधारे तलाव आकडेवारी
मृतसाठा : 5 दशलक्ष घनफूट
उपयुक्त पाणीा : 34 दशलक्ष घनफूट
क्षमता : 39 दशलक्ष घनफूट
एकूण क्षेत्र : 235 हेक्टर
सिंचन क्षेत्र : 150 हेक्टर

गुरवपिंप्री पाटबंधारे तलावाचे चित्र
मृतसाठा : 25 दशलक्ष घनफूट
उपयुक्त पाणी : 40 दशलक्ष घनफूट
क्षमता : 136 दशलक्ष घनफूट
एकूण क्षेत्र : 1152 हेक्टर
सिंचन क्षेत्र : 520 हेक्टर

आजपर्यंत झालेल्या थोड्याफार पावसाने खरिपाची पिके आली आहेत. परंतु, मोठा पाऊस न झाल्यास रब्बी पिकांना पाणी कमी पडणार आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही.
-सचिन दरेकर
माजी सरपंच, कोंभळी

मोठा पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव यांना समाधानकारक पाणी आले नाही. शेतकर्‍यांचे मोठ्या पावसाकडे लक्ष लागले असून, तलाव न भरल्यास पुढील पिकांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
-पंडित तापकीर, शेतकरी, खांडवी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT