अहमदनगर

कुकडीचे विशेष आवर्तन आजपासून

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

आमदार पवार यांच्या प्रयत्नांतून शेतकर्‍यांना पुन्हा एकदा कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असून, आज, दि. 9 जूनपासून कुकडीचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. कुकडीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यांमधून शेतकरी करत होते.

यावर्षी अवकाळी पाऊस पडलेला नाही. तसेच 7 जून रोजी मृग नक्षत्र सुरू होते. मृगाच्या पावसालाही सुरुवात झालेली नाही. त्यातच पावसाळा लांबल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते. पाण्याअभावी शेतकर्‍यांची पिके फळबागा संकटात सापडली होती. उन्हाळी पिकांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

त्यामुळे तातडीने कुकडीचे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी करीत होते. तालुक्यातील दुर्गावसह अनेक पाझर तलाव कोरडे पडले आहेत. जनावरे आणि माणसांना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत तत्काळ बैठक घेऊन पारनेर, श्रीगोंदा, करमाळा व कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी कुकडीचे विशेष आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला.

SCROLL FOR NEXT