कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील दूध उत्पादकांचे नेते अशी ओळख असलेले सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून कर्जत तालुका दूध संघाच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी एकत्र येऊन तालुका दूध संघाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. तालुका दूध संघाचे 'सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ' असे नामांतर करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दादाभाऊ चितळकर, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रामचंद्र मांडगे, व्हाईस चेअरमन नारायण धस, शशिकांत देशमुख, कर्जत तालुका दूध संघाचे चेअरमन शंकरराव देशमुख, संघाचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, श्यामराव काळे, रावसाहेब खराडे, रामजी पाटील, अंकुशराव दळवी, दादा खराडे, जनार्धन मोढळे, बप्पासाहेब धांडे, अशोक शिंदे, नवनाथ खेडकर, अनिल सुद्रिक यांच्यासह दूध संघाचे सर्व पदाधिकारी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चितळकर म्हणाले की, कर्जत तालुक्यातील शेतकर्यांसाठी धवलक्रांती घडविणारे एकमेव नेते म्हणून बाळासाहेब पाटील यांची ओळख आहे. त्यांनी शेतकर्यांसाठी आयुष्य वेचले. जिल्हा दूध संघ व नंतर कर्जत तालुका दूध संघासाठी अग्रेसर भूमिका घेऊन शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा सातत्याने ध्यास असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. बंद पडलेला कर्जत तालुका दूध संघ पुन्हा सुरू केला. खासगी दूध व्यवसायाशी स्पर्धा कशी करावी, याचे बाळकडू पाटील यांनी दिले.
अशा सहकार महर्षी नेत्याचे नाव तालुका दूध संघाला देण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. चेअरमन मांडगे म्हणाले की, बाळासाहेब पाटील यांनी दूध व्यवसायासाठी संपूर्ण जीवन वेचले. आजारी असताना देखील शेतकर्यांचा कळवळा कायम होता. शेतकर्यांसाठी जिद्दीने काम करणारा नेता कर्जत तालुक्यात निर्माण झाला, हे तालुक्यातील जनतेचे भाग्य आहे.
धस म्हणाले की, जिल्हा दूध संघाला बाळासाहेब पाटील यांच्या अनुभवाचा फायदा नेहमीच झाला. त्यांच्यामुळे जिल्हा दूध संघ राज्यात दूध उत्पादन आणि शेतकर्यांना भाव देण्यात अग्रेसर होता.
चेअरमन देशमुख म्हणाले की, बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा दूध संघापासून ते कर्जत तालुक्यातील दूध संघाच्या निर्मितीपर्यंत आहोरात्र काम केले. त्यांच्या त्यागामधूनच तालुका दूध संघाची निर्मिती झाली. शेतकर्यांच्या हाती पैसे रहावे, दुधाला चांगला भाव मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने धडपड केली. त्यामुळे तालुका दूध संघाला सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रावसाहेब खराडे यांनी केले.