कर्जत : पुढारी वृत्तसेवा : शहरातील अग्निशमन केंद्र इमारतीस स्व. जीवनराव ऊर्फ बापूसाहेब ढोकरीकर यांचे नाव देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये घेण्यात आला. नगरपंचायतअंतर्गत होत असलेल्या अग्निशमन केंद्र इमारतीसाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. जिल्हा नियोजन समितीमधून हा निधी प्राप्त झाला आहे. यासाठी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले होते.
या अग्निशमन केंद्र इमारतीसाठी कर्जत शहरांमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती, आमदार पवार यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रसाद ढोकरीकर व प्रवीण ढोकरीकर यांनी स्वतःची 16 गुंठे जागा नगरपंचायतीला दिली. या जागेचे खरेदीखतही नगरपंचायतला करून दिले आहे. यानंतर जिल्हा नियोजन समिती निधीमधून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील व तालुक्यातील नागरिकांना आपत्कालीन सुविधा तत्काळ उपलब्ध होईल म्हणून आमदार पवार यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले.
या इमारतीस जीवनराव ऊर्फ बापूसाहेब ढोकरीकर यांचे नाव देण्यासाठी नगरपंचायतने विशेष सभा बोलवली. यावेळी नगरसेवक नामदेव राऊत यांनी सूचना मांडली, तर अनुमोदन नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी दिले. या इमारतीस ढोकरीकर यांचे नाव द्यावे, अशी सूचना भूमिपूजन समारंभ कार्यक्रमांमध्ये आमदार पवार यांनी दिली होती. यासाठी आमदार पवार, नामदेव राऊत, प्रवीण घुले, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सर्व विभागाचे सभापती व नगरसेवक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील शेलार, प्राध्यापक विशाल मेहेत्रे, उद्योजक दीपक शिंदे या सर्वांनी अग्निशमन केंद्र इमारत होण्यासाठी प्रयत्न केले.