अहमदनगर

आरोग्य केंद्राबाहेर झळकला ‘विकणे आहे’चा फलक, नागरिक झाले आक्रमक

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या वेळी प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेला तिच्या कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. आरोग्य केंद्राचे गेट बंद असल्याने तासभर आवाज देवूनही झोपलेल्या कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला नाही, अखेर आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती झाली.

केवळ नशीब बलवत्तर म्हणून
केवळ नशीब बलवत्तर म्हणून अन् सामाजिक कार्यकर्ते संदेश कार्ले यांनी प्रसंगावधान दाखविल्याने आई व बालकाचे प्राण वाचले. नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी (दि.3) पहाटे ही संतापजनक घटना घडली. यानंतर ग्रामस्थांनी संतप्त होत आरोग्य केंद्राबाहेर आंदोलन करत 'आरोग्य केंद्र विकणे आहे'चे फलक झळकवला. नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सुमारे तीन कोटी रुपये खर्चून सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधलेली आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला रात्री अपरात्री आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा या मागील उद्देश आहे; मात्र येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या उद्देशाला हरताळ फासल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी (दि.3) पहाटे परिसरात पाल ठोकून राहणार्‍या कुटुंबातील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला आरोग्य केंद्रात नेले. तेथे गेट आतून लावलेले होते.जवळपास तासभर तिचे नातेवाईक आवाज देत होते; परंतु आतमध्ये झोपलेल्या कर्मचार्‍यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अशातच आरोग्यकेंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती झाली. मोठ्याने आरडाओरडा झाल्याने शेजारील निखिल जाधव यांचे कुटुंबीय तेथे मदतीला आले, त्यांनी सरपंच शहाजी आटोळे, रुग्णवाहिकाचालकांना फोन केले. सरपंचांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना फोन केले; परंतु कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

आरोग्य केंद्राबाहेर आंदोलन
आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ दुपारी संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली टाकळी काझी आरोग्य केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी 'आरोग्य केंद्र विकणे आहे' असे फलक दाखवत निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड, माजी सदस्य पोपट निमसे, टाकळी काझीचे सरपंच अविनाश पवार, शंकर ढगे, अशोक ढगे, राजू नारळे, निखिल जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT