वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील भोरवाडी येथील जुन्या पिढीतील लोककलावंत लक्ष्मण लहुजी उमाप (वय 85) यांचा नगर-पुणे मार्गावर कामरगाव येथे अपघाती मृत्यू झाला. पोतराज उमाप हे नगरला येण्यासाठी भोरवाडीहून कामरगावला गेले होते. तेथे बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत असताना खासगी आराम बसने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.30) सकाळी 9.40 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आरपीआयच्या आठवले गटाचे नगर तालुका उपाध्यक्ष अविनाश उमाप यांचे ते आजोबा होत. या संदर्भात नगर तालुका पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.