अहमदनगर

आमदार नीलेश लंकेंचे शिवबंधन पुन्हा चमकले! आत्महत्येच्या तयारीतील युवकांचे समुपदेशन

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : आमदार नीलेश लंके यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना मंगळवारी आपला हात दाखवत शिवबंधन आजही आपल्या हाती असल्याचे दाखवून दिले. निमित्त होते, आमदार लंके यांनी मंत्रालयाच्या माळ्यावरून उडी मारुन आत्महत्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांचे मन परिवर्तन करण्याचे. आमदार लंके या प्रसंगावधानचे कौतुक होत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले, असता त्यांनी आमदार लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यावेळी त्यानी आपले शिवबंधन त्यांना दाखविले.

तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या आमदार नीलेश लंके यांनी आत्महत्येच्या दारात असलेल्या दोन तरुणांना मतपरिवर्तन करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे मराठा आरक्षण न मिळाल्याने नोकरीची संधी हुकलेल्या या युवकांनी मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवण्याचा घाट घातला होता. मात्र, आमदार लंके यांनी प्रसंगावधान राखत त्यांचे समपदेशन केले. त्यामुळे या दोघांचे प्राण वाचू शकले. सूटबूट, बडेजावपणा, लवाजमा या गोष्टींपासून लांब असणार्‍या आमदार लंके यांचा साधेपणा अधोरेखीत होतोच. त्याचबरोबर त्यांच्यामधील माणुसकी अन् संवेदनशीलपणाचा प्रत्यय कोरोनाबरोबर अनेकदा समोर आला आहे.

मंगळवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजता मंत्रालयात अशाच प्रकारची घटना घडली. अनेकांना आमदार लंके यांचा कनवाळू आणि प्रेमळ स्वभावाबरोबर माणुसकीवर असलेली नितांत श्रद्धा प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. मराठा आरक्षणामुळे नोकरीची संधी हुकलेल्या दोन तरुणांनी दिवसभर मंत्रालयातील एका कार्यालयात ठाण मांडला; मात्र त्यांचे प्रत्यक्षात काम होऊ शकले नाही. त्याचबरोबर संधी मिळणार नसल्याचे कळल्यानंतर कमालीचे नैराश्य त्यांच्यामध्ये आले. त्यामुळे त्यांनी थेट मंत्रालयाचा सातवा मजला गाठला आणि तेथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस, मंत्रालयीन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी आले. 'जर कोणी पुढे आले, तर लगेच उडी मारून जीवन यात्रा संपूर्ण,' अशा प्रकारची इशारा वजा धमकी दिल्याने सर्वांचे तोंडचे पाणी पळाले. मंत्रालयात अक्षरशा त्रेधातिरपीट उडाली. सुदैवाने आपल्या कामासाठी मंत्रालयात आलेल्या पारनेर, नगरच्या आमदारांनी संबंधित युवकांना साद घातली. अंतर दूर असल्याने आवाज येत नव्हता; मात्र फोनच्या माध्यमातून "मी नीलेश लंके बोलतोय, तुम्ही असे काही करू नका, मी तुम्हाला मदत करतो," अशाप्रकारची विनंती केली.

दरम्यान, आमदार लंके आपल्याला ग्वाही देत आहेत. त्याचबरोबर न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत. हीच गोष्टी त्या दोन्ही युवकांच्या मनाला भिडली. 'दुसरे कोणी नको, फक्त तुम्हीच पुढे, या असे ते युवक म्हणाले. यानंतर आमदार लंके यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून या तरुणांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्यांच्या शिष्टाईमुळे आत्महत्याचे प्रयत्न एक प्रकारे हाणून पाडले. या घटनेचे हजारो जण साक्षीदार ठरले.

उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप!
सायंकाळी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विधान भवनामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी मंत्रालयात घडलेल्या आत्महत्येचा प्रयत्नची घटना त्यांच्या कानावर घालण्यात आली. त्याचबरोबर लंके यांच्या यशस्वी शिष्टाईबाबत त्यांना सांगण्यात आले. नीलेश हा सर्वात मोठा शिवसैनिक असल्याचे सांगत त्यांनी लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT