अहमदनगर

अहमदनगर : टेम्पोच्या धडकेत दौंडचे दाम्पत्य ठार

दिनेश चोरगे

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा :  नगर-दौंड महामार्गावरील कण्हेर मळा शिवारात (कोळगाव) रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या तिघांना पाठीमागून येणार्‍या आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी घडली. संभाजी मानसिंगराव मोहिते (वय 50) व प्रियंका संभाजी मोहिते (वय 45, रा. सिद्धार्थनगर,) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मोहिते दाम्पत्य हे मूळ दौंडचे. दौंडहून ते रविवारी आपल्या
दुचाकीवरून नगरकडे येत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी कण्हेर मळा शिवारात पंक्चर झाली. दुचाकी ढकलत घेऊन जात असताना घारगाव येथील दोघे तरूण पाठीमागून आले. मदत करण्याच्या भावनेने त्या दोघांनी त्यांना थांबविले.
तुम्ही दुचाकी माझ्याकडे द्या व तुम्ही दोघे माझ्यासोबत चला, असे ते या दाम्पत्याला म्हणाले.

त्यानंतर घारगाव येथील एका तरुणाने पंक्चर झालेली मोहिते यांची दुचाकी ढकलत पुढे जाण्यास सुरुवात केली. तर, हे दोघे पतीपत्नी घारगावच्या दुसर्‍या तरूणाच्या दुचाकीवर बसत असतानाच, पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर टेम्पोने या तिघांना उडविले. टेम्पोची धडक एवढी जोराची होती की, संभाजी मोहिते हे जागीच ठार झाले. तर, प्रियंका मोहिते यांना टेम्पोने काही अंतर  पुढे ओढत नेले. घारगाव येथील मदत करणारा तरुण बाजूला फेकला गेला. तो या अपघातात जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच कोळगावचे माजी उपसरपंच नितीन नलगे यांनी जखमी प्रियांका मोहिते यांना उपचारासाठी कोळगाव येथे नेले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तेथून शासकीय रुग्णवाहिकेतून नगर येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच प्रियांका मोहिते यांचा मृत्यू झाला.अपघातांनतर चालक टेम्पो जागेवर सोडून पळून गेला. घटनास्थळी बेलवंडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

मुलाचा फोन अन् अपघाताची माहिती संभाजी मोहिते हे पत्नीसमवेत दौंड येथून नगरला निघाल्यानंतर त्यावेळी मुलगा रोहित यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं. दुपारी एकच्या दरम्यान रोहित याने आई-वडील कुठे पोहचले आहेत, हे विचारण्यासाठी त्यांना फोन केला. मात्र, त्याच वेळी त्याला त्यांचा हा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती समजली. मोबाईल पाहण्याचा नादात  अपघात झाल्यानंतर चालक टेम्पो तेथेच सोडून तेथून पळून गेला आहे. मात्र, हा चालक टेम्पो चालवित असताना मोबाईल पाहत असल्यानेच त्याचे रस्त्यावरून चाललेल्या या तिघांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच हा अपघात होऊन दोघांचा नाहक बळी गेला, अशी माहिती अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT