नगर : पुढारी वृत्तसेवा : समाजकल्याण विभागाच्या योजनांतून सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिेजे, या उदात्त हेतूने लवकरच 275 कडबाकुट्टी आणि 833 शिलाई मशिनचे वाटप हे लॉटरी पद्धतीने व पारदर्शीपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी पाऊले उचलली आहेत. नुकतीच समाजकल्याण अधिकारी राधाकृष्ण देवढे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली असून, यात लांगोरे यांनी तशा सूचना केल्याचेही समजले.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना विविध योजनांच्या लाभ वाटपातून प्रचंड ओढातान व्हायची. राजकीय सोयीच्या दृष्टीने लाभार्थी निवडले जायचे. सत्ताधार्यांना झुकते माप, तर विरोधकांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली जायची. यात लाभासाठी अर्ज केलेली सर्वसामान्य जनताही वंचित रहायची. मात्र आता प्रशासक असल्याने समाजकल्याणसह अन्य योजनांची सोडत वेळेत आणि ती देखील पारदर्शी करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.
सीईओ आशिष येरेकर, अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी गेल्या महिन्यात कडबाकुट्टी आणि शिलाई मशीन लाभासाठी पंचायत समिती स्तरावरून प्रस्ताव बोलावले आहेत. दि.15 डिसेंबरपर्यंत प्रस्तावाची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर लवकरच लाभार्थी निवड केली जाणार आहे. योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेबाबत नुकतीच अतिरिक्त सीईओ लांगोरे, समाजकल्याण अधिकारी देवढे यांनी सर्व बीडीओंसमवेत बैठक घेतली आहे.
दिव्यांग वधू-वरांसाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून 50 हजारांचे अनुदान दिले जाते. तसेच दिव्यांग तरूणांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणेकामी समाजकल्याण विभागाची योजना आहे. यात बँकेच्या माध्यमातून दीड लाखांपर्यंत कर्ज मिळवणे शक्य आहे. यातून कर्ज परतफेडीवेळी अनुदान दिले जाते. या योेजनेसाठीही अर्ज मागाविण्यात आलेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून कडबाकुट्टी व शिलाई मशिन वाटपासाठी प्रस्ताव मागाविण्यात आलेले आहेत. 15 डिसेंबरपर्यंत हे अर्ज दाखल होतील. त्यानंतर लवकरच लाभार्थी निवड केली जाईल. पारदर्शी निवडीसाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल, अशी माहिती जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.