अहमदनगर

युवक बिंगो जुगाराच्या चक्रव्युहात : पोलिसांनी दखल घेण्याची पालकांची मागणी

Laxman Dhenge

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगावचे युवक चक्रीच्या बिंगो जुगाराच्या चक्रव्युहात अडकले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात काही ठिकाणी बेकायदेशीरपणे पुन्हा सुरू झालेला बिंगो जुगार आत्महत्येस प्रवृत्त करणारा आहे. याची पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात बंद असलेला चक्रीचा बिंगो जुगार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. या जुगाराने अनेक युवकांचे भविष्य बरबाद झाल्याची उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे तर यामुळे काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात या जुगाराचा दुष्परिणाम झाला असताना, आता पुन्हा एकदा नव्या जोमाने शहरात हा जुगार सुरु झाला आहे. अर्थात तो सुरू करताना पोलिसांची अलिखीत परवानगीची गरज भासली असणार आणि आपली आर्थिक आत्महत्या नको असल्याने, केवळ पोलिसांनी दिलेल्या होकारार्थी शब्दाने बिंगो जुगार सुरू झाला, यात कोणालाही शंका नसेल हे तितकेच सत्य आहे. शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीमध्ये झालेल्या दंगलीमुळे अनेक अनधिकृत व्यवसाय बंद झाले होते.

या दंगलीनंतर शहरातील शांतता पूर्ववत होत असताना अनधिकृत व्यवसायांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा बस्तान मांडण्याचे काम सुरू केले आहे. त्यातच आता दहा ते बारा ठिकाणी बिंगो जुगार हा तरूण पिढीला घातक ठरणारा बेकायदेशीर व्यवसाय सुरू झाल्याने पालक हवालदिल झाले आहेत. एका स्थानिक पोलिसाच्या हाती याचे नेटवर्क असून, आमचे हित त्यातच आमचे सौख्य, अशा भूमिकेने या जुगाराला पाठबळ मिळत आहे. या बाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेण्याची मागणी शहरातून केली जात आहे.

SCROLL FOR NEXT