अहमदनगर

नगर : पोलिस अधिकार्‍याकडून महिलेस मारहाण ; टोलनाक्यावरील घटना

अमृता चौगुले

सुपा : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने महिलेस मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान सुपा ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेत या अधिकार्‍याच्या कारनाम्यांचा पाढा वाचला. मंत्री विखे पाटील यांनी योग्य ती कारवाई करावी अशा सूचना पोलिस अधिक्षकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुपा गावातील दुकाने बंद करण्यावरून पोलिस अधिकारी व सरपंच पती योगेश रोकडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याचा व्हिडीओही सर्वत्र चर्चेत आहे. 'लक्ष्मी'दर्शनाचा उल्लेख त्या व्हिडीओत असल्याने विविध चर्चेला उधान आले. दरम्यान या पोलिस अधिकार्‍यांविरोधात चाळीस लोकांचे तक्रारी अर्ज सुपा ग्रामपंचायतीत आल्याचे समजते. आ. नीलेश लंके यांच्याकडेही या अधिकार्‍यांविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरपंच मनीषा रोकडे, उपसरपंच दत्ता नाना पवार, माजी उपसरपंच सागर मैड, मधुकर पठारे, विजय पवार, व्यवसायिक जब्बार शेख, उद्योजक योगेश रोकडे, माजी सरपंच बाळासाहेब कळमकर यांच्यासह ग्रामस्थांनी पालकमंत्री विखे यांची भेट घेत पोलिस अधिकार्‍यांची मनमानी पुराव्यासह निदर्शनास आणून दिली. मंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांवर 'योग्य ती कार्य करण्याचा आदेश' दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 3 मार्चपर्यंत संबंधित अधिकार्‍यांची बदली करावी अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

अधिकार्‍यांचा शाळेभोवती पिंगा

मराठी शाळा परिसरात या पोलिस अधिकार्‍यांची चक्कर नित्याची झाली आहे. पुण्याच्या दिशेने कारमधून आलेल्या महिलेस पोलिस अधिकारी मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला कोण?, मराठी शाळेभोवती पोलिस अधिकारी पिंगा का घालतात?, याबाबत चर्चेला उधान आले आहेे.

टार्गेट..टपरी ते उद्योजक !

वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी टपरीवाल्यापासून ते उद्योजकांपर्यंत या पोलिस अधिकार्‍यांचे 'दूत' पोहचतात. 'दुताला भाव' दिला नाहीतर दमबाजी करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रारी ग्रामपंचायतीकडे आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT