अहमदनगर

नगर : पाथर्डीत शिक्षणाचा बाजार ; पैसे द्या, पाथर्डीत अ‍ॅडमिशन घ्या, घरीच रहा..सरळ परीक्षेला या अन् उत्तीर्ण व्हा

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : हजारो रुपये घेऊन कॉपी पुरविण्यापासून परीक्षा उत्तीर्ण करण्यापर्यंत पैसे उकळणारा 'तो' संस्थाचालक कोण?, असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडला आहे. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे संस्थेशी संबंधित एजंटांनी प्रत्येकी 30 ते 70 हजार रुपये द्या अन् पाथर्डी तालुक्यात 'अ‍ॅडमिशन घ्या आणि घरीच रहा, सरळ परीक्षेला या अन् उत्तीर्ण व्हा' अशी हमी देणार्‍या तालुक्यामध्ये किती संस्था आहेत. त्याचा शोध शिक्षण विभाग घेणार का?, असा प्रश्न आहे. तालुक्यात मांडलेला शिक्षणाचा धंदा प्रशासन बंद करणार का?, याप्रकरणाची संबंधित काही संस्था चालकांनी एजंटांच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा केली आहे. यामध्ये संस्थाचालक कोट्यधीश झाले असून, एजंट शिक्षक लखपती झाले आहेत.

अशा संस्थांमध्ये अकरावी, बारावीचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना बाहेरून विद्यार्थी आणण्याबरोबर काही स्थानिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एमए बीएड, एमएससी बीएड, अशा उच्च पदवीधारक प्राध्यापकांची नेमणूक शासकीय व शैक्षणिक धोरणानुसार करण्याचा नियम असताना सर्व शासकीय शैक्षणिक धोरणांचा फज्जा उडवीत या संस्थेच्या शाळांमध्ये डीएड. तर, काही ठिकाणी चक्क बारावी उत्तीर्ण शिक्षकांची भरती केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळ करून शिक्षणाचा बाजार मांडला आहे. या संस्थांमधील शिक्षकांच्या पदव्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

जिल्हा शिक्षण विभाग, तालुका शिक्षण विभागाचे अशा शैक्षणिक संस्थाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का?, त्यांना कुणी मान्यता दिल्या, अशा शाळांची पटसंख्या व प्रत्यक्षात हजर विद्यार्थी किती? याची तपासणी वर्षातून किती वेळा होते? या मागचे गौड बंगाल काय?, राजरोस हा सर्व प्रकार चालू असताना शिक्षण विभागाच्या डोळ्यावर पट्टी का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काही वर्षांपासून दहावी, बारावी परीक्षेच्या वेळी दरवर्षी अशी वृत्ते वर्तमानपत्रात प्रकाशित होत आहेत. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही असा प्रश्न आहे.

पाथर्डी तालुक्यात प्रवेशासाठी झुंबड 

विद्यार्थ्यांची कमी, मात्र उत्तीर्ण व्हायची हमी असल्याने पाथर्डी तालुक्यामध्ये पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची दहावी, बारावी प्रवेशासाठी झुंबड उडते. यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, बाजार भरल्यागत बाहेरून कॉपी पुविणारे आणि उत्तीर्ण करण्याची जबाबदारी घेऊन हात ओले झालेले एजंट शिक्षक आतमध्ये जाऊन कॉप्या पुरवितात. परीक्षेत कॉपी मिळाली नाही अन् करता आली नाही म्हणून एजंटला मारहाण करून तक्रार देण्यासाठी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांनी चक्क पोलिस ठाणेच गाठले होते.

बोगस शिक्षकांना सुपर व्हिजन

काही परीक्षा केंद्रावर पदवी नसतानाही बोगस शिक्षकांना सुपर व्हिजन दिली जाते. हा मोठा सामूहिक शैक्षणिक घोटाळा असून, यामध्ये शिक्षण विभागासह कोणाकोणाचे हात ओले झालेत? असा सवाल आहे. नूतन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशानुसार जिल्हाभर परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा चालू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भरारी पथके व बैठी पथके नियुक्त केले आहेत. असे असताना तालुक्यामध्ये एजंटांनी कॉप्या पुरवतो फंडा आणून विद्यार्थी आणि पालकांची अर्थिक लूट केली गेली, यामागे कोण कोण आहेत याचा शोध घेणे अपेक्षित आहे.

पार्थ नगरीच्या नावाची राज्यात बदनामी
हुशार विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये मात्र, या प्रकारामुळे तीव्र असंतोष आहे. या गैरप्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. एकेकाळी बुद्धिवंतांची, शेकडो अधिकारी, हजारो शिक्षक राज्याला देणार्‍या पार्थ नगरीचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावला असून, सर्व स्तरातून याबद्दल विचारमंथन होणे गरजेचे आहे. या महाठगांमुळे पार्थ नगरीचे नाव राज्यात बदनाम होत आहे. बारावीचे परीक्षा केंद्र पाथर्डी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा आहे. मात्र, ग्रामीण भागातील केंद्रावर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT