अहमदनगर

नगर : आठ दिवसांत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार; ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील नागरिकांचे विविध प्रश्न तत्काळ निकाली लागावेत, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा पहिलाच दरबार असल्यामुळे निवेदन आणि प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उडाली होती. सार्वजनिक आणि व्यक्तीगत जीवनातील विविध समस्या नागरिकांनी यावेळी सादर केल्या.येत्या आठ दिवसांत या निवेदनावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांना नागरिकांना दिले. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांचा रविवारी दुपारी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, पारनेर- श्रीगोंदा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, नगरचे तहसीलदार उमेश पाटील,तहसीलदार वैशाली आव्हाड यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी समस्यांचे निवेदन घेऊन येणार्‍या नागरिकांची नियोजित उपहारगृहात तालुकानिहाय नोंदणी करुन त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. अधिकार्‍यांची आढावा बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील जनता दरबारात आले. प्रारंभी त्यांनी प्र्रत्येक नागरिकांच्या खुर्चीजवळ जात त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्या निवेदनावर टीप्पणी करुन संबंधित अधिकार्‍यांना याकडे लक्ष घालण्याचे आदेश देत होते. पाच -सहा नागरिकांची निवेदने घेतल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढली. या गर्दीचे नियोजन करणे अधिकारी व पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेले. पालकमंत्री विखे पाटील यांनी देखील खुर्चीत बसा. गर्दी करु नका, सर्वाचे निवेदन स्वीकारले जातील, असे आवाहन केले. परंतु नागरिकांची रेटारेटी आणि गोंधळ सुरुच होता.

त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रारंभी सार्वजनिक विकासकामांचे निवेदन स्वीकारली. यामध्ये जामखेड, पारनेर, नगर तालुक्यांतील निवेदनाचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी एकाच वेळी सर्वांचे निवेदने स्वीकारली. त्यानंतर त्यांनीच नंबरप्रमाणे एक एक निवेदन हाती घेत संबंधित व्यक्ती व शिष्टमंडळाचे नाव पुकारत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवेदनावर आवश्यक ती टीप्पणी करीत निवेदन स्वीय सहायक तसेच अधिकार्‍यांना दिले.

या निवेदनात वीजपुरवठा खंडित, शासकीय घरांवरील अतिक्रमण, वारसांची नोंद रखडणे, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरुस्ती, पतसंस्थामधील ठेवी मिळाव्यात, जमिनीची मोजणी रखडली आदी प्रकारच्या निवेदनाचा समावेश आहे. मात्र, रविवारी सायंकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांना जनता दरबार आटोपता घेतला. उपलब्ध झालेल्या निवेदनावर येत्या आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आवश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले.

सोलापूर, बीडच्या नागरिकांची दरबारात हजेरी

ना विखे पाटील सोलापूर जिल्ह्याचे देखील पालकमंत्री आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील एका खेड्यातील चार-पाच जणांनी या जनता दरबारात हजेरी लावली. शेतजमीन मोजणी करण्यासाठी हवी ती शासकीय रक्कम भरली. रक्कम भरुन तीन वर्षांचा काळ लोटला. परंतु अद्याप मोजणीसाठी कोणी आले नाही, असे पंढरपूरच्या व्यक्तींनी सांगितले. याशिवाय बीड, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील काही नागरिक महसूल व इतर विभागांच्या समस्या घेऊन आले होते.

तलाठी कार्यालय आहे त्याच गावात ठेवा

शेवगाव तालुक्यातील हसनापूर या गावातील तलाठी कार्यालय दुसर्‍या गावात हलविण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे हसनापूर येथील शेषराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच नवनाथ ढाकणे, माजी सरपंच अशोक शिरसाठ, सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय घायगुडे, सुखदेव खंडागळे व काही गावकर्‍यांनी या जनता दरबारात हजेरी लावली. तलाठी कार्यालय हलवू नये, या मागणीचे निवेदन महसूल मंत्री विखे पाटील यांना दिल्याचे शेषराव ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT