अहमदनगर

नगर : जावयाकडून पत्नी, सासर्‍याला जबर मारहाण

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा: पती-पत्नीच्या वादातून सासर्‍याला व पत्नीला लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.3) दुपारी भिस्तबाग महालाजवळ घडली. या घटनेत आरोपीची पत्नी व सासरे दोघेही गंभीर जखमी झाले. याबाबत आरोपीची सासू रेखा विश्वनाथ कसबे (वय 47, रा.ढवणवस्ती, ता.जि.नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी महेश माणिक भेटे (रा. पोखर्डी ता.जि.नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

फिर्यादीच्या मुलीशी महेश भेटे याचा 4 वर्षापूर्वी विवाह झाला आहे. काही दिवसांपासून आरोपी हा पत्नी किर्ती यांना दारू पिऊन मारहाण करत होता. या त्रासाबद्दल फिर्यादी यांनी भरोसा सेलकडे महेश भेटे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपीचा भाऊ मोहन माणिक भेटे याने तक्रार देऊ नको, मी पोलिसमध्ये आहे, असा दम दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पत्नी किर्ती व सासरे विश्वनाथ कसबे यांना आरोपीने भिस्तबाग महालाजवळ गाठून तुम्हाला सर्वांना मारून टाकीन असे म्हणत, हातातील पाईपने दोघांच्याही डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तोफखाना पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक पी. डी. आठरे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT