राहुरी : पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड रस्त्याची व्यथा न्यारी, राजकीय नेत्यांचे भाषणच भारी, असेच काही म्हणण्याची वेळ प्रवाशी व नागरीकांवर आली आहे. नगर- मनमाड रस्त्याबाबत राजकीय नेत्यांचे उणे- दुणे सुरूच आहे, परंतु रस्त्याच्या कामाचे विघ्न कोणीच सोडवित नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशभरात अमेरिकेप्रमाणे रस्ते तयार करण्याचे स्वप्न दाखवित असतानाच नगर- मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग का अपवाद ठरतो, हे कळेनासे झाले आहे. नगर- मनमाड रस्त्याचा भुंगा जिल्ह्याच्या विकासाला अडसर ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास म्हणजेच अपघाताला निमंत्रण हे तेवढेच खरे ठरत आहे. एका मागोमाग अपघात घडत असताना अनेकांचे संसार उघड्यावर पडले. शेकडो महिलांच्या डोक्यावरील कुंकू पुसले गेले तर अनेक कुटुंबाचे कर्ता व्यक्ती अपघातामध्ये मयत झाला. नगर- मनमाड रस्त्यावर रक्ताचा सडा वाहत असताना लाल रक्ताचे राजकारणच होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
टक्केवारीमुळे रस्त्याचा प्रश्न चिघळ्याचे आरोप प्रत्यारोप झाले. नगर- मनमाड रस्त्याचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन दौर्यांमुळे नक्की मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. तसा प्रयत्नही झाला. 400 कोटी रूपये मंजूर होऊन कामास प्रारंभ झाला, परंतु सुमारे जीएसटीसह 49 टक्के कमी टेंडर पाहता ठेकेदाराने पळ काढणे पसंत केले. रस्त्याचे काम तर झाले नाही, याउलट काम सुरू करण्यासाठी झालेल्या खोदकामांमुळे रस्त्याची अवस्था मोठ्या प्रमाणात खालावली. अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. याबाबत तत्काळ उपाययोजना काढत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यास जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते एकत्र येतील का..?
आंदोलने, निवेदने द्यावी तरी किती?
नगर- मनमाड रस्त्यासाठी सामाजिक, उद्योजक क्षेत्रातील तरूणांनी एकत्र येत बिगर राजकीय संघटना तयार करीत लढा नगर- मनमाड रस्त्यासाठी अशी विनवणी करीत अनेकांना एकत्रित आणले. रस्त्यासाठी शेकडो निवेदने दिली. आंदोलने कली. रस्त्याचे काम तर झाले नाही. त्याउलट वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहता मृत अपघातग्रस्तांना मदतीसाठी संबंधित संघटना सरसावल्याचे चित्र आहे.