नगर : पुढारी वृत्तसेवा : विकास मंडळात कामासाठी निधी मिळविताना मागील पदाधिकार्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले नाही. त्यामुळे हे काम अर्धवट राहिले. बँकेच्या संचालक मंडळाने कोणतीही अडवणूक केली नाही. लोकांची संमतीपत्रे त्यांना मिळविता आली नाही, त्यामुळे बँकेला मदत करता आली नाही. मात्र आम्ही मागच्यासारख्या चुका करणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न साकार करू, अशी ग्वाही गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी दरम्यान, मागील सत्ताधारी रोहोकले गटाने सभेकडे पाठ फिरविल्याचे दिसले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनात काल रविवारी खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विलास गवळी, उपाध्यक्ष संजय शेंडगे, राजेंद्र निमसे आदींसह ज्येष्ठ शिक्षक नेते साहेबराव अनाप, राजकुमार साळवे, सदिच्छाचे राजेंद्र शिंदे, इब्टाचे एकनाथ व्यवहारे, शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, गुरुकुलचे संजय धामणे, रवींद्र पिंपळे, राजेंद्र सदगीर, संजय शेळके, संदीप मोटे, आण्णासाहेब आभाळे, कैलास सारोक्ते, कल्याण लवांडे, अर्जून शिरसाठ,शिक्षक बँकेचे सीईओ मुरदारे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते सलिमखान पठाण यांनी मागील कारभार्यांवर ताशेरे ओढताना हॉस्पिटलसाठी बँकेतील ठेवी न वापरता सामाजिक संस्थांची मदत घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षक भारतीच्या वतीने दिनेश खोसे यांनी हॉस्पिटलला अकरा हजारांची देणगी जाहीर केली.
टीकेच्या भीतीने पळ काढला : शिंदे
मागील विश्वस्तांच्या कारभाराचा हा अहवाल असल्याने सभासदांना उत्तरे द्यावी लागतील, या भितीनेच त्यांनी सभेपासून पळ काढला. तसेच नाटके लिहिणार्यांवरही भाष्य करत डॉ. कळमकरांनाही सदिच्छाचे राजेंद्र शिंदे यांनी लक्ष्य केले. आभार अनिता उगले यांनी मानले.
श्वेतपत्रिकेतून रोहकलेंच्या कारभारावर टीका
विद्यार्थी वसतिगृहाची जागा परस्पर पाडली
नाट्यसंकुल उभारण्याचा एकतर्फी निर्णय घेतला
इमारत बांधकामासाठी 91 लाख रुपये गोळा केले
ई टेंडर न काढता 10 कोेटी 26 लाखांना काम दिले
विकास मंडळाकडील भाड्याचे एक कोटीही खर्च केले
बांधकाम परवाना 42, तर ठेकेदाराला 60 लाख खर्च दाखविला
इमारतीचे डिझाईन करणार्याला चार लाख 13 हजारांचा मोबदला
इमारत अर्धवट; ठेवी आणि व्याजही अडचणीत, जबाबदार कोण?
सेवानिवृत्तीच्या सोयीसाठी विकास मंडळाच्या घटनेतही केला बदल
सल्लागार मंडळातून समन्वय : बापूसाहेब तांबे
सर्व गुरुजींच्या स्वप्नातील विकास मंडळ साकारण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. विकास मंडळाच्या जागेत उभारावयाच्या गुरुजी सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी सर्व गुरुजींनी सामाजिक भावनेतून सहकार्य करावे, त्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचे सल्लागार मंडळ नेमण्यात येईल, या मंडळाच्या सल्ल्याने हॉस्पिटल उभारणीचे काम केले जाईल, असा विश्वास गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी व्यक्त केला. या निर्णयाचे विरोधी मंडळानेही स्वागत केले.