नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील 240 गावांत जलयुक्त अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी 15 मार्चपर्यंत गावांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर शिवारफेरी काढून जलसंधारण कामांचे आराखडे तयार केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, झेडपीचे सीईओ आशिष येरेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुुद्रे, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपवनसंरक्षक सुवर्णा माने तसेच जलयुक्त शिवार अभियान संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या योजनेचा उदृेश विचारात घेऊन सर्वानी सकारात्मक भूमिकेतून जबाबदारी उचलावी. निश्चित करण्यात आलेल्या निकषानुसार गावांची निवड करावी. त्यादृष्टीने कामांचे आराखडे तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले. जलयुक्त योजनेसाठी निवडलेल्या गावांत माथा ते पायथा या तत्वानुसार कामे केली जावीत.स्थानिक गावक़र्यांचा या कामांत सहभाग महत्वाचा असणार असल्याचे पद्मश्री पवार यांनी सांगितले.