अहमदनगर

जिल्ह्यातील 223 पूरप्रवण गावांवर वॉच; खबरदारी म्हणून 500 जणांना प्रशिक्षण; 7 बोटींची व्यवस्था

Sanket Limkar

नगर : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील अतिवृष्टी; नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यांतील धरणांतून मोठ्या प्रमाणात सोडला जाणारा विसर्ग, धरणांचा फुगवटा, नदीपात्रांतील अतिक्रमणे व पूररेषेतील लोकांचा स्थलांतरास विरोध आदींमुळे गोदावरी, प्रवरा, मुळा, भीमा, सीना आदी नद्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. याचा फटका जिल्ह्यातील 223 पूरप्रवण गावांना बसतो. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने 500 आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले असून, आवश्यक प्रमाणात बोटी जिल्हास्तरावर उपलब्ध केल्या आहेत.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व आढावा झाली. पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गेल्या वर्षीच 500 स्वयंसेवकांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण दिलेले आहे. या आपदा मित्रांना लाईफ जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, गमबूट, रेनसूट, फर्स्ट एड किट बॉक्स, रोप, एलईडी टॉर्च आदी साहित्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावर इनफ्लॅटेबल बोट, लाईफ जॅकेट, फ्लोटिंग स्ट्रचर, लाईफबोटी आदी साहित्याचे जिल्हास्तरीय किट प्राप्त झाले आहेत.

शासनाकडून नगर महापालिका आणि नगरपालिकांसाठी 12 इनफ्लॅटेबल टेन्ट उपलब्ध झाले असून, त्यासाठी जिल्हास्तरावर एप्रिल महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. नगरपालिकांना टेन्ट वितरित करण्यात आले आहेत.

आतापर्यंतचे नद्यांचे पूर

गोदावरी : 291525 क्युसेक (2019)
प्रवरा : 20918 क्युसेक (2006)
38913 क्युसेक (2008)
मुळा : 44000 क्युसेक (2006)
भीमा : 257000 क्युसूक (2006)
घोड : 106000 क्युसेक (2006)
सीना : 10539 (2006).

बोटींची उपलब्धता

जिल्ह्यात 5 रबरी तर 2 फायबर बोटी उपलब्ध आहेत. 15 मे रोजी शासनाकडून जिल्ह्यासाठी एक इनफ्लॅटेबल बोट उपलब्ध झालेली आहे.

  • रबर बोट : नगर महापालिका : 1, नगर पोलिस विभाग : 1, कोपरगाव नगरपरिषद : 1, नेवासा तहसील: 1, श्रीगोंदा तहसील (आर्वी): 1,
  • फायबर बोट : नेवासा तहसील: 1, कर्जत तहसील: 1.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT