शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : साई बाबांची ख्याती सातासमुद्रापार पोहचलेली असताना राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून साईंच्या शिर्डीची ओळख निर्माण झालेली आहे. साईबाबांच्या मंदिर परिसरात साईबाबा संस्थान केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती शिर्डी ग्रामस्थांना समजली आहे. सदरची सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात येऊ नये, या मागणीसाठी येत्या 1 मे कामगार दिनी शिर्डी बंदची हाक देऊन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
शिर्डीतील हॉटेल द्वारका पार्क मध्ये शिर्डी ग्रामस्थांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिवससेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, माजी नगरसेवक राजेंद्र कोते, माजी नगरसेवक अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, रमेश गोंदकर, सचिन तांबे, तुषार गोंदकर, ताराचंद कोते, गजानन शेर्वेकर, मनसेचे दत्तात्रय कोते, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान असे ठरले की, साईबाबा संस्थानवर सध्या त्रिसदस्यीय समिती असून या समितीने असा घाट घातला आहे की, सध्या साई मंदिरात साई भक्तांच्या सुरक्षेसाठी संस्थानचे सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्या कर्मचार्यांऐवजी केंद्रीय राखीव सुरक्षा दल नेमणार असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आहे.
हे केंद्रीय राखीव सुरक्षा दल नियुक्त करू नये, अशी एकमुखी मागणी त्या बैठकीत ग्रामस्थांनी केली. बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, 1 मे कामगार दिनी सायंकाळी 5 वाजेपासून शिर्डी गाव बंदची हाक दिली जाणार असून अशा प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी नेमावा
साईबाबा संस्थानवर राज्य शासनाने आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त न करता उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करावी. त्याचप्रमाणे साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमतांना शिर्डी ग्रामस्थांतील 50 टक्के विश्वस्त नेमावे, अशी मागणी त्या बैठकीत मागण्यावर चर्चा करण्यात आल्या.