नगर : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या 264 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची धावपळ सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 264 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना नुकतीच प्रसिध्द केली आहे. आयोगाने तत्काळ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे.
20 जून 2022 पूर्वी आरक्षणासह अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यांत काही गावांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मे महिन्यात जाहीर केला होता. त्यानुसार 13 मे 2022 पर्यंत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन ती पूर्ण केली.
त्यानंतर 19 मेपर्यंत अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. 25 मेपर्यंत 264 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना तयार झाली. जिल्हा प्रशासनाने 27 मे 2022 रोजी ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द केली आहे.
प्रभागरचना पूर्ण होऊन चार दिवस उलटत नाही तोच राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आरक्षण सोडत काढण्यासाठी 3 जून 2022 रोजी 264 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेची सूचना जारी केली जाणार आहे. 6 जूनपूर्वी विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी अधिकारी नियुक्त करून प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 7 जून 2022 पर्यंत प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे.
या आरक्षणावर 7 जून ते 10 जूनदरम्यान हरकती मागविल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी 15 जूनपर्यंत अभिप्राय सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 17 जून 2022 पर्यंत जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) मान्यता देणार असून 20 जूनला अंतिम प्रभागरचना आरक्षणासह प्रसिध्द केली जाणार आहे.
आरक्षण सोडतीमुळे 264 गावांतील राजकीय वातावरण तापणार आहे. पाऊसमान पाहून सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जुलै-ऑगस्ट या महिन्यांत 264 गावांपैकी काही गावांत रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण जागा वाढणार
ओबीसीविना आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ओबीसी आरक्षण आता सर्वसाधारण होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागा वाढणार आहेत. अनुसूचित महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा, असे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती
जोर्वे, काष्टी, दहिगावने, माहेगाव देशमुख, राजूर, कमालपूर साकुरी, सावळीविहीर बु., भाळवणी, सोनगाव, साकूर, बनपिंप्री, बेलवंडी, तळेगाव दिघे, धांदरफळ बुद्रूक व खुर्द, कुळधरण, तिसगाव, कोल्हार (पाथर्डी), कापूरवाडी, कोल्हेवाडी या राजकीयदृष्ट्या नावाजलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ऐन पावसाळयात राजकीय वातावरण तापणार आहे.