अहमदनगर

अहमदनगर : ‘जलजीवन’ची माहिती ग्रामस्थांनाही समजणार!

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन योजनेच्या कामाची सर्व तपशील असलेले फलक संबंधित गावाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना ठेकेदारांना दिल्या आहेत. दरम्यान, योजनेच्या कामांतील पारदर्शकता दर्शविणारे हे फलक लावण्यात संगमनेर तालुक्याने आघाडी घेतली असून, येथील सर्व 72 योजनांचे फलक लागले आहे. लवकरच जिल्ह्यातील उवर्रीत 759 योजनांचे हे फलकांतून गावकर्‍यांना आपल्या योजनांची माहिती समजणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत 829 योजनांच्या माध्यमातून सुमारे एक हजार गावांची तहान भागविली जाणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्वच कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकारी, ठेकेदारांना तंबी भरलेली आहे. त्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार योजनेच्या कामांचा तपशील असलेले फलक त्या गावच्या दर्शनी भागात लावण्याबाबतही येरेकर यांनी ठेकेदारांना सूचना केलेल्या आहेेत. त्यानुसार कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांनी योजनेच्या ठिकाणी किंवा गावच्या दर्शनी भागात हे फलक लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे. यात सर्वप्रथम संगमनेर तालुक्यातील 72 योजनांची फलके त्या त्या गावात पहायला मिळत आहे.

फलकावर काय असणार माहिती

प्रत्येक योजनेचे तीन फलक असणार आहेत. यात योजनेचा तपशील, गुगल मॅप व वितरण व्यवस्थेची ड्राईंग असेल. मुख्य फलकावर गावाचे नाव, पाणी पुरवठा योजनेचे नाव, एकूण किंमत, ग्रामसभेतील मंजुरी दिनांक, केंद्र हिस्सा निधी, राज्य हिस्सा निधी, लोकवर्गणी, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेशाचा दिनांक, योजना पूर्ण होण्याचा कालावधी, अंमलबजावणी यंत्रणा, अंमलबजावणी सहाय संस्था याची माहिती यावर असणार आहे. याशिवाय ठेकेदार, सरपंच, उपसरपंच, शाखा अभियंता, उपअभियंता, ग्रामसेवक यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांकही असणार आहे.

सीईओंनी सर्व योजनांचे संबंधित गावात फलक लावण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील 72 योजनांचे फलक लागले असून, लवकरच उवर्रीत योजनांची फलके लावली जाणार आहेत. यातून ग्रामस्थांनाही योजनांचा सर्व तपशील समजणार आहे.

– श्रीरंग गडदे, कार्यकारी अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT