अहमदनगर

गावकारभारी : आज निकाल ; सकाळी 10 पासून मतमोजणी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींसाठी 3 लाख 77 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, नव्या वर्षात कोणकोणत्या गावकारभार्‍यांना गावाची सेवा करण्याची संधी उपलब्ध होणार, याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. यासाठी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण विजयी होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.  दरम्यान, मतमोजणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असून, पोलिस बंदोबस्त कडक तैनात करण्यात आला आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा, श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर, वांगी खुर्द, नेवासा तालुक्यातील चिंचबन, अकोले तालुक्यातील शिळवंडे, सोमालवाडी, राहाता तालुक्यातील लोहगाव, श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री या आठ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झालेल्या आहेत. याशिवाय संगमनेर तालुक्यातील डोळासणे, सायखिंडी, अकोले तालुक्यातील ब्राम्हणगाव, नेवासा तालुक्यातील सुरेशनगर, खुपटी, शिरेगाव, हिंगोणी या सात ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले.

त्यानुसार 195 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.याग्रामपंचायतींसाठी एकूण 4 लाख 61 हजार 912 मतदार होते. त्यापैकी 3 लाख 77 हजार 436 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वच तालुक्यात सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींची मतमोजणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकूल येथील बॅडमिंटन हॉस्पिटलमध्ये होणार आहे. उर्वरित तेरा तालुक्यांतील ग्रामपंचायतींची मतमोजणी त्या त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात होणार आहे. निवडणूक विभागाने पास दिलेल्या उमेदवारांना अथवा त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधी यापैकी एकालाच प्रवेश दिला जाणार आहे.

नगर तालुक्यासाठी दहा टेबल

मतमोजणीसाठी प्रत्येक तालुक्यात ग्रामपंचायतींनुसार व्यवस्था केली आहे. नगर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. त्यासाठी 10 टेबलची व्यवस्था केली. याशिवाय तीन टंबल रार्खींव असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक मतमोजणी अधिकारी व एक शिपाई अशा तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. राखीव टेबलवर नऊ जणांची नियुक्ती असणार आहे. एकंदरीत 39 कर्मचार्‍यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली. पहिल्या दहा ग्रामपंचायतींची मतमोजणी झाल्यास दुसर्‍या 10 ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. 12 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार आहेत.

पहिला निकाल सदस्यांचा नंतर सरपंच

मतमोजणी टेबलवर वार्डनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक वार्डात तीन सदस्यांच्या जागा आहेत. त्यामुळे पहिल्या वार्डात सरपंचपदाच्या उमेदवारांची त्यानंतर वार्डातील तीन सदस्यांची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक वार्डातून विजयी सदस्य घोषित होणार आहे. त्यानंतर सरपंचपदासाठी मिळालेली प्रत्येक वार्डातील मते एकत्रित केली जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र एकत्रित नावाचे पथक कार्यरत असणार आहे. त्यानंतर सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव घाषित केले जाणार आहे.

धाकधूक आणि उत्सुकता

प्रत्येक गावात सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच होती. गावातील मातब्बर आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असणार्‍या व्यक्तींनी सरपंच होण्याचा चंग बांधला. त्यानुसार प्रचारात खर्च देखील तेवढाच केला. सदस्य होण्यासाठी देखील उमेदवारांनी मोठया प्रमाणात खर्च केला आहे. भाऊदादा करत, त्यांची हवी तेवढी हौस मौज करुनही मतदार राजा शेवटी काय करेल याचा भरवसा नसल्यामुळे सरपंचासह सदस्यपदाच्या उमेदवारांची धाकधूक वाडली आहे. गावाचा सरपंच आणि सदस्य कोण होणार याची उत्सुकता मात्र, गावागावांतील जनतेला लागली आहे.

तालुकानिहाय होणारी मतमोजणी

अकोले :9344,

संगमनेर :78918,

कोपरगाव : 45528,

श्रीरामपूर : 7971,

राहाता : 25173,

राहुरी : 23114,

नेवासा :19843,

नगर : 44700,

पारनेर : 34206,

पाथर्डी : 21106,

शेवगाव : 19983,

कर्जत : 13512,

जामखेड : 5638,

श्रीगोंदा 28400.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT