अहमदनगर

काष्टी : ‘ती’ व्हिडियो क्लिप व्हायरल झाली आणि तालुक्यात या नेत्याची चर्चा सुरु झाली !

अमृता चौगुले

दत्ता पाचपुते : 

काष्टी : अहो साहेब, हे काय करून बसलात.. तुम्ही अश्लिल फोटो आणि व्हिडिओ कशाला व्हायरल केले? आरं.. मला सोशल मीडियातलं काय कळतं..मोबाईलचा वापर फक्त फोन घेण्या आणि करण्यासाठीच तर मी करतो ना.. ते फोटो, व्हिडिओ मला नेत्याला पाठवायचे होते.. अहो साहेब, पण ते फोटो आणि व्हिडिओ एका ग्रुपवर पडलेत.. त्या ग्रुपमध्ये बायका पण आहेत.. साहेब.. ते कोणत्या ग्रुपवर गेले.. व्हायरल कसे झाले.. आता.. आता रं.. आता काय करायचं?.. यथेच्छ मद्यपान करून एका ढाब्यावर तराट अवस्था प्राप्त झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील एक पांढरपेशी नेता आणि त्याच्या कार्यकर्त्यांमधील हा संवाद! या प्रकारानं मात्र तालुक्यात एकच गोंधळ माजलाय.

त्याचं असं झालं, की तालुक्याच्या राजकारणात एक पांढरपेशी नेता आहे. स्वत:च्या 'इमेज'ला सतत जपणारा. गावच्या ग्रामपंचायत सदस्यत्वापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना अशा सर्वच राजकीय बलस्थानांवर वरचष्मा असलेलं व्यक्तिमत्व! पण अडचण एकच झाली. सोशल मीडियाच्या या जमान्यात मोबाईलचा वापर फोन घेणे आणि करणे, या पलिकडं या नेत्यानं आजवर फारसा केलेलाच नाही.

ही झाली पार्श्वभूमि. पण खरी गम्मत तर ढाब्यावरच घडली. मंगळवारी रात्री एका ढाब्यावर यथेच्छ मद्यपान झाल्यावर या नेत्याच्या डोक्यात काय आलं, कोणास ठावूक? मोबाईलमध्ये असलेले फोटो आणि व्हिडिओ कोणा राजकीय नेत्याला पाठवायचे ठरवले.. आणि तिथंच सगळा घोळ झाला. संबंधित नेत्याला फोटो आणि व्हिडिओ पाठवताना, ते एका ग्रुपवर पडले. चांगल्या कामाचे स्वागत करणार्‍या संबंधित ग्रुपमध्ये महिलांचाही सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ पाहताच, ग्रुपमधील सदस्यांनी आरडा-ओरड सुरू केली. काही जण तर त्या ग्रुपमधून थेट बाहेरच पडले.

संबंधित नेत्याला सोशल मीडियाची फारशी जाण नाही, हे माहित असलेल्या कार्यकर्त्यांची मात्र एकच भंबेरी उडाली. आपला नेता काय करून बसला, आणि केलं ते तरी त्यांना कळालंय का, फोटो, व्हिडिओ डिलिट करावे लागणार.. पण नेता नेमका आहे कुठे? कार्यकर्त्यांची फोनाफोनी सुरू झाली. नशेतल्या नेत्याला जेव्हा फोन आले, तेव्हा त्यांची निम्मी तिथंच उतरली.

अहो साहेब, हे काय करून बसलात.. तुम्ही अश्लिल फोटो आणि व्हिडिओ कशाला व्हायरल केले?
आरं.. मला सोशल मीडियातलं काय कळतं..मोबाईलचा वापर फक्त फोन घेण्या आणि करण्यासाठीच मी करतो. ग्रुपवर पाठवलेले फोटो, व्हिडिओ मला माझ्या नेत्याला पाठवायचे होते. चुकून त्यांच्या ग्रुपवर गेले अन् व्हायरल झाले.. आता.. आता रं काय करायचं?.. मला तर त्यातलं कायच कळत नाय.. आता आधी डिलिट मारा ते फोटो आणि व्हिडिओ.. असं कार्यकर्त्यानं सांगितलं खरं, पण ते कसं करायचं, हेच नेत्याला माहित नव्हतं. अखेरीस कार्यकर्त्यानं जे काही करता येईल, ते केलं. पण.. तोपर्यंत ते फोटो आणि व्हिडिओ ग्रुपमधील सर्वच सदस्यांपर्यंत पोहोचले होते. ते विरोधकांच्या हाती लागू नयेत, यासाठी कार्यकर्त्यांची धडपड चालली होती. ग्रुप अ‍ॅडमिनशी संपर्क साधून फोटो आणि व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले. पण.. तोवर वेळ हातून गेली होती.. नको तेच झालं होतं.. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेच होते.. रात्रीस चाललेला हा खेळ थांबतो न थांबातो तोच.. आता या प्रकारावर प्रतिक्रियांचा पाऊसही पडू लागला आहे आणि सगळीकडे एकच सूर उमठतोय 'साहेब.. हे वागणं बरं नव्हं..'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT