लोणी; पुढारी वृत्तसेवा : जमिनीची सुपिकता, ऊस लागवड तंत्र, खत व पाणी व्यवस्थापनाबरोबरच पीकसंरक्षण या पंचसुत्रीचा वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उत्पादन घेताना उत्पादनाचा लक्षांक निश्चित करून पुढे जाण्यासाठी 'अमृत कलश' योजना निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास उस शेतीचे अभ्यासक कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी व्यक्त केला.
महसूलमंत्री तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखानाच्या वतीने 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' वर्षानिमित्त ऊस उत्पादक शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अमृत कलश' योजना सुरू केली आहे. या योजनेचा भाग म्हणून ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आय.सी. ए. आर.च्या जैविक कीड नियंत्रण प्रयोग शाळा, प्रवरा फळे भाजीपाला संस्था आणि कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर यांच्या वतीने आयोजित ऊस पीक परिसंवादात डॉ. संजीव माने यांनी शेतकर्यांना ऊस शेतीचे शास्त्रीय मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नेते माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे उपध्याक्ष विश्वासराव कडू, भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा गिताताई थेटे, आ. राधाकृष्ण विखे पाटील ट्रक संस्थेचे अध्यक्ष नंदुशेठ राठी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोक म्हसे , उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कार्यकारी संचालक अभिजित भागडे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख आदींसह ऊस उत्पादक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. संजीव माने म्हणाले, ऊस शेतीकडे शाश्वत पीक म्हणून आज बघितले जाते. जमीनीची सुपिकता हा ऊस शेतीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. सेंद्रीय कर्ब कमी होत असताना शेण खत, असेंद्रीय पेंडी, हिरवळीचे खते, गांडूळ खताचा वापर करून सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज जमीनीच्या सुपिकता वाढीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
जास्त रासायनिक खते जास्त उत्पादन हा समज दूर करतांना डॉ. माने म्हणाले. लागवडीपूर्वी माती परिक्षणनुसार खतांचा वापर, योग्य प्रमाणात शेण खत अथवा इतर सेंद्रीय खतांची मात्रा देत असतांना मुख्य, दुय्यम सुक्ष्म आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. मशागत करताना उसाच्या मुळांना माती लागते, ही काळजी घेत पहारीने खताची मात्रा देण्याचे आवाहान करून ऊस हे कमी पाण्यात येणारे पीक आहे. थोडे- थोडे सारखे पाणी देताना वापसा पद्धतीने पाण्याचा वापर करताना ठिबकच्या वापरावर भर दिला तर उत्पादनात वाढ होते.
पीक संरक्षण करताना बेणे प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून फवारणी करताना पोषक, किटनाशक आणि बुरशीनाशकांची मात्रा वापरावी, असे सांगून ऊस उत्पादन वाढीसाठी 'अमृत कलश योजना' चळवळ करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत असताना ऊसाचे उत्पादन तंत्र समजून घेताना योग्य प्रमाणात फुटवे, उसाची पंचसुत्री तंत्र आणि योग्य प्रमाण मिळणारा सुर्य प्रकाश या गोष्टी समजूम घेत लागवड करण्यावर भर द्यावा, असे सांगून पाचट जाळू नका असे त्यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादनामध्ये सरीला अत्यंत महत्त्व
ऊस उत्पादनामध्ये सरीला अत्यंत महत्त्व आहे. मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये साडेचार फूट, काळ्या जमिनीमध्ये पाच फूट तर भारी जमिनीमध्ये सहा फूट सरीचा अवलंब करताना उसाला सूर्यप्रकाश कसा मिळेल, यावर भर देण्याची गरज असल्याचे ऊस शेतीचे अभ्यासक कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी शेतकर्यांना सांगितले.