अहमदनगर

नगर : ठाकरे गटाच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता कार्यकर्त्यांना बैठकांपासून दूर ठेवून डावलले जात असल्याचा आरोप

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बैठकांपासून दूर ठेवून डावलले जात असल्याने सध्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे तालुक्यात होणारे दौरे, कार्यक्रम व बैठकांना निमंत्रण दिले जात नसल्याने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षात फूट पडल्यानंतरही आम्ही एकनिष्ठ राहिलो. मात्र, तरीही 'हेचि फळ काय मम तपाला' असे म्हणण्याची वेळ सध्या निष्ठावंतांवर आली आहे.

तालुक्यात शिवसेना वाढवण्यासाठी नवनाथ चव्हाण, आसाराम ससे, विष्णूपंत पवार, अनिल फुंदे, दिलीप गायकवाड, यमाजी भिसे, संतोष मेघुंडे, सागर राठोड, नवनाथ उगलमुगले, नवनाथ वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. यापैकी काही जणांवर माणिकदौण्डी येथे झालेल्या जातीय वादात गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. ही सर्व मंडळी आजही शिवसेनेत असली तरीही, गेल्या काही दिवसांपासून मात्र आम्हाला डावलले जात असल्याचा सूर त्यांच्यामध्ये निघू लागला आहे.

मध्यंतरी तालुक्यात पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत अनेक शाखांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या संपर्क कार्यालयात सुद्धा पक्षाच्या बैठका घेण्यात आल्या. मात्र, या कार्यक्रमांना मूळ शिवसैनिकांना बोलावण्यात आले नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तालुका दौर्‍यावर आले असताना सुद्धा असाच प्रकार घडला. पक्षात मोठी फूट पडल्यानंतर काहींनी मोहटादेवी गड ते मातोश्री अशी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला मात्र त्यालाही पक्षातूनच विरोध झाला, असा आरोप आता शिवसैनिक करत आहेत. आता आपल्यालाच डावलले जात असल्याने पुढे काय, असा प्रश्न निष्ठावान गटासमोर उभा ठाकला आहे. असाच प्रकार चालू राहून पक्षातील निष्ठावंत बाजूला गेल्यास आगामी काळात पक्ष संघटना कोसळण्यास वेळ लागणार नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे निष्ठावंतांतून बोलले जात आहे.

नेत्यांनी आमची दखल घ्यावी
गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही शिवसेनेचे काम करत आहोत. मात्र, आता पक्षाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळत नाही. दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात कार्यक्रम झाल्याचे समजते. आम्ही 'मातोश्री'ला मानत असून, दुसरीकडे जाण्याचा विचार नाही. मात्र नेत्यांनी आमची दखल घ्यावी, असे नवनाथ चव्हाण यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT