टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांवर भरती सुरू असल्याचे सांगून बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या उमेदवारांनी बोगस लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज केले असून, त्याद्वारे पैसे भरले आहेत. यानंतर अनेक उमेदवारांना निवडीचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर प्रकरण समोर आले. विद्यापीठाची पदभरती प्रक्रियेची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येते. त्यामुळे कोणत्याही वेबसाईवर किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन विद्यापीठाच्या प्रशासनाने केले आहे.
विद्यापीठाच्या नावे काही समाजमाध्यमे व काही माध्यमांद्वारे 'विद्यापीठअंतर्गत रिक्त जागांची भरती संधी चुकू नका!' अशा मथळ्याखाली निवेदने प्रसिध्द होत आहेत. या निवेदनांना अनुसरून बेरोजगार तरुणांकडून शुल्क भरून अर्ज करण्यात येत आहेत. त्यानंतर ही लिंक बदलून त्याऐवजी नवी लिंक सुरू करण्यात येते. नोकरी मिळेल, या आशेने उमेदवार लिंकवरही अर्ज करत आहेत; मात्र भरती प्रक्रियेबाबत पुढे काहीच कार्यवाही होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे उमेदवारांच्या लक्षात येत आहेत. काही उमेदवारांकडून मोठी रक्कम आकारून उमेदवारांना एखाद्या पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात येत आहेत. हे बनावट नियुक्तीपत्र घेऊन काही उमेदवार विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात आल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरूणांची मोठी आर्थिक फसवणूक होत आहे.
नगर जिल्ह्यात असे प्रकार अधिक असल्याचे विद्यापीठाच्या प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत कुणाची फसवणूक झाल्यास पोलिसांत तक्रार दाखल करावी.
वेबसाईट पहा व पोलिसांत तक्रार करा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून भरतीची प्रक्रिया सरकारने नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार केली जाते. विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेची माहिती कायम अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते; मात्र पुणे विद्यापीठाच्या नावे रिक्त जागांची प्रसिध्द झालेली निवड प्रक्रिया बेकायदेशीर अन् बोगस असून, या निवेदनांचा विद्यापीठाशी काहीही सबंध नाही. याबाबत विद्यापीठाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन सावित्रीबाई पुणे विद्यापीठ प्रशासनाने केले.
विद्यापीठात नोकर भरतीचे पारनेर कनेक्शन?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांवर नोकरी लावण्यासाठी बोगस वेबसाईट व लिंक देऊन आर्थिक फसवणुकीला बळी पडलेले तरूण बेरोजगार सर्वात जास्त पारनेर तालुक्यातील आहेत. यामुळे हे कनेक्शन पारनेर तालुक्याभोवती फिरत असल्याचे दिसते. संबंधित कनेक्शनचा पर्दाफाश करण्यासाठी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांत तक्रार द्यावी, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.