अहमदनगर

राहुरीमध्ये दुचाकी चोरांचा सुळसुळाट

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी सर्वसामान्यांमध्ये अक्षरशःधडकी भरवली आहे. दुचाकी घरासमोरून, दुकानासमोरून अलगदपणे उचलत नेत मालकांशी पैशाचा सौदा जोमात सुरू आहे. तालुक्यातील म्हैसगाव येथील पत्रकाराची तर शहरातून बँक मॅनेजरची चक्क चारचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला. दरम्यान, यावर पोलिसांची केवळ बघ्याची भूमिका सर्वसामन्यांसह मध्यमवर्गीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

म्हैसगाव येथील पत्रकार सुभाष आग्रे यांच्या दुकानासमोरून चोरट्याने दुचाकी चोरून नेली. आग्रे यांचे भर बाजारपेठेमध्ये जनरल स्टोअर्स आहे. सायंकाळी 7.30 वाजता चोरट्याने अत्यंत शिताफिने हातसफाई दाखवित बाजारपेठ गजबजलेली असताना दुचाकी चोरून नेली. चोरट्याने कोळेवाडीच्या दिशेने ही दुचाकी नेली. आग्रे यांची हिरो कंपनीची (एक्स प्रो एम एच 17 बीसी 3461) दुचाकी चोरट्याने 2 मार्च रोजी सायंकाळी चोरून नेली.

अशा दुचाकी चोरीच्या घटना नित्यानेच घडत असताना चारचाकी वाहने असुरक्षित असल्याचे दिसत आहे. शहरात अ‍ॅक्सिस बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक प्रविण कडुबा केजभट यांचे चारचाकी वाहन चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात केजभट (वय 31 वर्षे, रा. औरंगाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे. केजभट हे राहुरी येथील गोकूळ कॉलनी येथे भाडोत्री घरात राहतात.

त्यांनी मारूती सुझुकी कंपनीची एरटीगा कार आणली होती. (एमएच 40 पी 4100) ही कार 25 फेब्रुवारी रोजी रात्री चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली. रात्री गायब झाल्यानंतर केजभट यांनी शोध घेतला, परंतु ती आढळली नाही. सीसीटिव्ही कॅमेरे पाहणीनंतर चोरट्याने पहाटे 4 वाजता कार चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पोलिसात कार चोरीची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

चोरट्यांची टोळी पकडण्यात अपयश..!
राहुरी पोलिसांकडून नेहमीप्रमाणे 'गुन्हा दाखल, तपास सुरू,' असे उत्तर मिळत आहे, परंतु पोलिसांना शहर व ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या चोरी, घरफोडी, दुकानफोडीसह दुचाकी व चारचाकी वाहनांची चोरी करणारी टोळी पकडण्यात अपयश आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT