अहमदनगर

नगर : दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी ऑनलाइन : पुणे व नगर जिल्ह्यात दरोडा, घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलीस पथकाने सापळा रचून जेरबंद केले. त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

७ मे रोजी राजेंद्र श्रीमंत भोस यांच्या घरातून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने व चांदीच्या पट्टया कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार किरण उर्फ सोन्या युवराज काळे (रा.बिटकेवाडी ता. कर्जत) व प्रविण शहाजी पवार (रा. धालवडी ता. कर्जत) यांनी केला आहे. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी बिटकेवाडी शिवारात कॉबिंग ऑपरेशन केले. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींकडुन सोन्याचे दागीने (28 ग्रॅम) व चांदीचे दागीने (70 ग्रॅम) असा एक लाख पंचेचाळीस
हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या इतर तिन साथीदारांसह दौंड व आळेफाटा या ठिकाणी दरोडा व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हेगार हे दरोडा व घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यांतर्गत घरफोडीचे २ गुन्हे, दोंड पोलीस ठाण्यांतर्गत पुणे ग्रामिण येथिल दरोड्याचे २ गुन्हे व घरफोडीचा १ गुन्हा तसेच आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण येथिल घरफोडीचा १ गुन्हा असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक समीर अभंग, अंकुश ढवळे, गोकळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT