अकोले: पुढारी वृत्तसेवा
आदिवासी भागातील एका गावात शाळा सुटल्यावर घरी जात असताना दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात थांबवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्या सहा जणांच्या टोळीवर पोक्सो कायद्याअंतर्गत राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत राजूर पोलिसांकडुन समजलेली माहिती अशी की, संबंधित दोघी अल्पवयीन बहीणी घरी जात असताना सहा जणांच्या टोळक्याने ‘आय लव यू जानू’ असे म्हणत त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
पिडित अल्पवयीन मुलींनी राजुर पोलिस ठाण्यात वरील प्रमाणे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुमित देवराम करवंदे, महेश गणपत भांगरे, जितू किरण ईदे, प्रशांत धोंगडे, रोहिदास मुंडे, साई प्रतीक अर्जुन भांगरे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर येथील घटनेनंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने अकोले तालुक्यात माहिती घेतली असता ‘दामिनी’ पथकाचा रोडरोमिओंमध्ये कसलाही धाक नसल्याचे दिसत आहे.
शाळा, कॉलेजमध्ये जाणार्या विद्यार्थिनींसह रस्त्याने ये-जा करणार्या महिलांची छेड काढली जात आहे. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी हे दामिनी पथक सक्रिय करावे, अशी मागणी होत आहे.